Turning Point Of RCB vs CSK Match ,IPL 2025: बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली. कधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आघाडीवर तर कधी चेन्नई सुपर किंग्ज आघाडीवर, असा सामना शेवटपर्यंत सुरू होता. मात्र, शेवटी बाजी मारली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला. यासह प्लेऑफचं तिकीट जवळजवळ निश्चित केलं आहे. मात्र, हातात असलेला सामना चेन्नई सुपर किंग्जने कुठे गमावला? जाणून घ्या.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. आव्हान मोठं होतं, पण या मैदानावर मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग होतो. सलामीला आलेला शेख रशीद पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला अवघ्या १४ धावा करता आल्या. त्यानंतर १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. आयुषने चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चेन्नईने ५ षटकांच्या आत ५० धावांचा पल्ला गाठला.
अवघ्या ५८ धावसंख्येवर चेन्नईला २ धक्के बसले. सॅम करन देखील स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि रविंद्र जडेजाने मोर्चा सांभाळला. दोघांनी मिळून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. आयुष म्हात्रेला आपलं पहिलं शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ९४ धावा करत माघारी परतला. त्याने आणखी ६ धावा केल्या असत्या तर दुसरा सर्वात युवा शतकवीर होण्याचा मान पटकावला असता.
बंगळुरू – चेन्नई सामन्यातील टर्निंग पॉईंट कोणता?
या सामन्यातील १७ व्या षटकापर्यंत सामना चेन्नईच्या बाजूने झुकलेला होता. मात्र याच षटकात सामना चेन्नईच्या हातून निसटला. सलामीला आलेल्या आयुष म्हात्रेने ४८ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. आयुष ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता, ते पाहता त्याने शतकही पूर्ण केलं असतं आणि सामनाही जिंकून दिला असता.
मात्र, तो बाद झाल्यानंतर चेन्नईला शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. एमएस धोनी यावेळी सामना फिनिश करू शकला नाही. शेवटी शिवम दुबेने षटकार खेचून चेन्नईला सामन्यात कमबॅक करून दिलं, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईला हा सामना २ धावांनी गमवावा लागला. चेन्नईचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता.