Vaibhav Suryavanshi Youngest Cricketer In IPL To Score A Century: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशीने वयाच्या १४व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळत अवघ्या ३५ चेंडूत दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात वैभवने ही कामगिरी केली आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने वैभवला गेल्या तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे.
आयपीएल २०२५ च्या लिलावात यंदा १४ वर्षीय भारतीय खेळाडू सामील झाला होता. राजस्थान रॉयल्सने या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात सामील केले होते. आता वैभव सूर्यवंशीला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. यासह वैभवने पदार्पणा करताच एक मोठा इतिहास घडवला आहे.
आयपीएल २०२५ च्या ३६ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला या लीगमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासह, तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. डावखुरा फलंदाज वैभवने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळाली आहे. वैभवचं वय फक्त १४ वर्ष आणि २३ दिवस आहे.
गुजरात टायटन्सने दिलेल्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी फलंदाजीला उतरले. वैभवने संथ सुरूवात करत नंतर गियर बदलले आणि वादळी शतक झळकावले. वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत ११ षटकार आणि ७ चौकारांच्या वादळी खेळीसह १०१ धावा करत वैभव बाद झाला. वैभव एका खेळीत सर्वाधिक षटकार लगावणारा राजस्थान रॉयल्सचा पहिला फलंदाज ठरला आहे.
कोण आहे वैभव सूर्यवंशी? (Who is Vaibhav Suryavanshi)
वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या समस्तीपूर येथील खेळाडू आहे, वैभव सूर्यवंशी १४ वर्षांचा आहे. या तरुण वयात त्याने रणजी करंडक, हेमंत करंडक, कूचबिहार करंडक आणि विनू मांकड ट्रॉफी खेळली आहे. अलीकडेच त्याची भारतीय अंडर-१९ संघातही निवड झाली होती.
वैभव सूर्यवंशीने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, त्याचे वडील संजीव यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वैभवला नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यासाठी वडिलांनी घरी जाळी बसवली होती. रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात वैभवला बिहारकडून पदार्पणाची संधी मिळाली. वैभवने अवघे १२ वर्षे आणि २८४ दिवस वय असताना पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. त्याच वर्षी, वैभव सूर्यवंशीने बिहार क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-१९ वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावले होते. अंडर-१९ स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिले त्रिशतकही ठरले.
आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी ४९१व्या क्रमांकावर होता. अनकॅप्ड खेळाडूंच्या (UBA9) श्रेणीत त्याचा समावेश होता. त्याने या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सूर्यवंशीने भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर -१९ युवा कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे पहिल्याच सामन्यात वैभवने धमाकेदार शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.