Vaibhav Suryavanshi Called His Father: जयपूरच्या मैदानावर खेळताना १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळणाऱ्या वैभवने आपल्या तिसऱ्याच सामन्यात या हंगामातील सर्वात वेगवान शतक झळकावलं. त्याच्या या शतकी खेळीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्विट करत त्याचं कौतुक केलं आहे. वैभवने अवघ्या ३५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीनंतर त्याने आपल्या वडिलांना फोन केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात वैभव सूर्यवंशी असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये वैभवला विचारलं जातं की, तू पहिला कॉल कोणाला करशील? यावर उत्तर देत वैभव म्हणतो, नक्कीच वडिलांना करेल. कॉल लावल्यानंतर तो वडिलांना प्रणाम करून आशीर्वाद घेतो. त्यानंतर फोन सपोर्ट स्टाफमधील सदस्य असलेल्या रोमी सरांकडे देतो.

दिग्गज खेळाडूंनी पोस्ट शेअर करत केलं कौतुक

वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. यासह भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील त्याचं कौतुक करण्यासाठी इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये त्याने वैभवचा फोटो शेअर करत क्लास असं लिहिलं होतं.

वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत युसुफ पठाणचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यापूर्वी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजाचा रेकॉर्ड युसुफ पठाणच्या नावावर होता.

युसुफ पठाण काय म्हणाला?

युसुफ पठाणने ज्यावेळी सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं त्यावेळी वैभव सूर्यवंशीचा जन्मही झाला नव्हता. युसुफने १५ वर्षांपूर्वी ३७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. युसुफने पोस्ट शेअर करत लिहिले की, “ एका भारतीय फलंदाजाने आयपीएलमध्ये माझा सर्वात जलद शतकाचा रेकॉर्ड मोडला, अभिनंदन वैभव सूर्यवंशी! राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हा रेकॉर्ड मोडला, हे आणखी विशेष..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.