Virat’s Special Record at Chinnaswamy Stadium : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १५वा सामना चिन्नास्वामी स्टेडियम बंगलुरु येथे खेळला जात आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आहेत. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर सामन्यात क्षेत्ररक्षण करायला उतरलेल्या आरसीबीच्या स्टार खेळाडू विराट कोहलीने मैदानात उतरताच इतिहास रचला. विराटने जे केले ते आजपर्यंत कोणताही भारतीय फलंदाज करू शकलेला नाही.

विराट कोहलीचा १०० वा सामना –

विराट कोहली चिन्नास्वामी स्टेडियमवर १०० वा टी-२० सामना खेळणारा पहिला फलंदाज ठरला आहे. अशा परिस्थितीत एकाच मैदानावर १०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. चिन्नास्वामी स्टेडियम हे आरसीबीचे होम ग्राउंड आहे. आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तो सध्या आयपीएलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय रियान परागनेही १८१ धावा केल्या आहेत.

विराटची आतापर्यंतची कामगिरी –

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. त्याने २० चेंडूत २१ धावांची खेळी खेळली. यानंतर विराटने शानदार पुनरागमन करत पुढच्या २ सामन्यात अर्धशतके झळकावली. विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. विराटने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या गेल्या सामन्यातही चांगली कामगिरी केली होती. तो ५९ चेंडूत ८३ धावा केल्यानंतर नाबाद परतला. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, आरसीबीने हा सामना ७ विकेटने गमावला.

हेही वाचा – IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊ सुपरजायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, नवीन उल हक, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मयंक यादव.