Preity Zinta’s Aloo Paratha Video Viral : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २७वा सामना शनिवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने ३ गडी राखून विजय मिळवला. प्रीती झिंटाच्या संघाने कधीही ट्रॉफी जिंकली नसली, तरी क्रिकेटबद्दलचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर कधीच कमी होत नाही. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रीतीने पंजाब किंग्जच्या खेळाडूंसाठी एकदा १२० आलू पराठे का बनवावे लागले होते, याबद्दल सांगितले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रिती झिंटा म्हणाली, “मी म्हणाले की मला आलू पराठा खायचा आहे. एका हॉटेलने आम्हाला मरलेला, थकलेला, सडलेला पराठा खायला दिला होता. मी म्हणाले की मी तुम्हाला शिकवते. यावर पंजाबच्या खेळाडूंनी मला विचारले की मी हे करेन का? यानंतर मी म्हणाले की, हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एक मोठा विजय मिळवाल आणि त्यांनी ते करु दाखवले. त्यानंतर मग मी म्हणाले, ठीक आहे आणि म्हणून मला त्यांच्यासाठी १२० आलू पराठे बनवावे लागले.” प्रीती झिंटाने नेहमीच तिच्या पीबीकेएस फ्रँचायझीचे जोरदार समर्थन केले आहे आणि अनेकदा गर्दीत तिच्या संघाच्या समर्थनार्थ ओरडताना दिसली आहे.
राजस्थान रॉयल्सने पाचवा सामना जिंकला –
शनिवारी पंजाबचा राजस्थानविरुद्ध झालेल्या सामना खूपच रोमहर्षक झाला. ज्यामध्ये शिमरॉन हेटमायरच्या १० चेंडूत २७ धावांच्या नाबाद खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा एक चेंडू आणि ३ राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या १४ चेंडूंमध्ये ३० धावांची गरज होती, त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल (पाच चेंडूत ११ धावा) या वेस्ट इंडिजच्या फलंदाज जोडीने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानला सहा सामन्यांतील पाचवा विजय मिळवून दिला. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ शिमरॉन हेटमायरने आपल्या नाबाद खेळीत एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. पंजाबला ८ बाद १४७ धावांवर रोखल्यानंतर राजस्थानने १९.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा करून गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. हेटमायरशिवाय यशस्वी जैस्वालनेही राजस्थानसाठी ३९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी –
आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्सने केवळ दोनदाच प्लेऑफची फेरी गाठली आहे आणि दोन्ही वेळा संघाला ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याचवेळी, आयपीएल २०२४ मध्ये पंजाबची कामगिरी आतापर्यंत काही विशेष राहिलेली नाही. संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवून हंगामाची सुरुवात केली, परंतु त्यानंतर पंजाबला ५ सामन्यांत केवळ १ विजय नोंदवता आला आहे. पीबीकेएसने आतापर्यंत ६ पैकी ४ सामने गमावले आहेत. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर यावेळीही त्यांना प्लेऑफ गाठणे सोपे जाणार नाही.