Yuvraj Singh Shared post for Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माने आपल्या फटकेबाजीने आणि शतकी खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादच्या आयपीएल २०२५ मधील पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात अविश्वसनीय खेळी करत संघाला मोठा विजय नोंदवण्यात मोठी भूमिका बजावली. अभिषेकने ५५ चेंडूत १२ चौकार आणि १० षटकारांसह १४१ धावांची वादळी खेळी केली. त्याची ही खेळी पाहून त्याचे क्रिकेटमधील गुरू युवराज सिंगने पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक शर्माने अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि संघाला आयपीएल इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरी सर्वात मोठी धावसंख्या गाठण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने शतक पूर्ण करताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतुक केलं. दरम्यान, आनंद साजरा करण्यासाठी अभिषेकने कॅमेऱ्याकडे एक पांढरी चिठ्ठी दाखवली, ज्यावर लिहिले होते – “ही खेळी ऑरेंज आर्मीसाठी आहे.” ‘ऑरेंज आर्मी’ हे सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना दिलेलें नाव आहे.

अभिषेक शर्माच्या या खेळीचं मैदानावरील खेळाडूंनी, संघसहकाऱ्यांनी तर कौतुक केलंच, पण भारताच्या दिग्गज खेळाडूंनीही कौतुक केलं. अभिषेक शर्मासाठी युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव यांनी पोस्ट शेअर करत त्याच्या खेळीचं कौतुक केलं. युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक शर्माने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली आहेत.

युवराज सिंग अभिषेक शर्मासाठी पोस्ट करत म्हणाला, “वाह शर्मा जी के बेटे… ९८ धावांवर असताना सिंगल, नंतर ९९ धावांवर असताना पण सिंगल घेत शतक पूर्ण केलं. तुझी इतकी मॅच्युरिटी माझ्या पचनी पडत नाहीये. असं म्हणत युवराजने एक इमोजी टाकला आहे. तर पुढे म्हणाला; उत्कृष्ट खेळी खेळलास अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेडही शानदार खेळला. हे दोन्ही सलामीवीर एकत्र खेळताना पाहणं मजेशीर आहे. श्रेयस अय्यरही कमाल खेळला.”

युवराज सिंगने एकेरी धावा घेऊन आपलं शतक पूर्ण केल्याबद्दल अभिषेक शर्माचं कौतुक केलं आहे. युवराज सिंगने अभिषेकला क्रिकेटचे धडे देताना कायम एक धाव आणि सिंगल घेण्याचं महत्त्व सांगितलं. पण अभिषेक शर्मा मोठमोठे फटके मारणं पसंत करतो. युवराज सिंग अभिषेकला सांगतो की जर तुला कसोटी क्रिकेट खेळायचं आहे तर एक धावा कशा घेता येतील याचं कसबही यायला हवं. पण अभिषेकच्या मते जर एका चेंडूवर ६ धावा येत असतील मी मोठा फटका खेळू शकत असेन तर सिंगल का घेऊ, असं म्हणणं आहे. यावरून युवराज अभिषेकला नेहमी ओरडत असतो. त्यामुळे युवराज सिंगने एक धाव घेण्याच्या त्याच्या मॅच्युरिटीचं कौतुक केलं आहे.

सामन्यानंतरच्या सादरीकरणात, अभिषेक शर्माने खुलासा केला की तो युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या सतत संपर्कात आहे. तो म्हणाला की दोन्ही वरिष्ठ खेळाडू त्याला मार्गदर्शन आणि प्रेरणा देत होते, ज्यामुळे त्याला आत्मविश्वास मिळाला. सूर्यकुमार यादवनेही अभिषेकच्या शतकाचा व्हीडिओ शेअर करत विश्वास ठेव असं म्हणत काही इमोजीसह पोस्ट शेअर केली.