वृद्धीमानची द्विशतकी खेळी, शेष भारताने जिंकला इराणी करंडक

पार्थिवपुढील अडचणी वाढत असताना वृद्धिमान साहाने चिकाटीने खेळपट्टीवर पाय रोवले

साहा आणि पुजारा यांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल ३१६ धावांची भागीदारी रचली.

दुखापतीवर मात करून वृद्धीमान साहा याने इराणी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्विशतकी खेळी साकारली. साहाच्या नाबाद २०३ आणि चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारतीय संघाने इराणी करंडक स्पर्धा जिंकली. शेष भारतीय संघासमोर रणजी विजेत्या गुजरात संघाने विजयासाठी ३७९ धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातचे आव्हान शेष भारतीय संघाने केवळ चार विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. साहा आणि पुजारा यांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल ३१६ धावांची भागीदारी रचली.

वाचा: वृद्धिमानचा ‘साहा’रा

 

तत्पूर्वी, सोमवारी पंचांबद्दल अपशब्द वापरणारा गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला अखेरच्या सत्रात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. पार्थिवपुढील अडचणी एकीकडे वाढत असताना शेष भारताच्या वृद्धिमान साहाने चिकाटीने खेळपट्टीवर पाय रोवत शतक झळकावले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. गुजरातच्या गोलंदाजीपुढे सुरुवातीला ४ बाद ६३ अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर शेष भारताचा संघ इराणी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या चौथ्या दिवशीच नामशेष होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कर्णधार चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान यांचा ‘साहा’रा मिळाल्यामुळे दिवसअखेर शेष भारताने ४ बाद २६६ अशी मजल मारली. त्यानंतर आज साहा आणि पुजाराने आपला फॉर्म कायम ठेवत गुजरातच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता संघाला महत्त्वपूर्ण विजय प्राप्त करून दिला.
साहाने आपल्या द्विशतकी खेळीत तब्बल २६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. तर पुजाराने आपल्या ११६ धावांच्या खेळीत १६ खणखणीत चौकार लगावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Irani trophy 2017 super saha wins it for rest of india

ताज्या बातम्या