वृद्धिमानचा ‘साहा’रा

क्रिकेटच्या अनिश्चिततेचा प्रत्यय इराणी स्पध्रेच्या चौथ्या दिवशी क्रिकेटरसिकांना आला.

नाबाद शतकासहित पुनरागमनाचा इशारा  

 

पुजारासोबत द्विशतकी भागीदारी ; शेष भारताला विजयासाठी ११३ धावांची आवश्यकता

पंचांबद्दल अपशब्द वापरणारा गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला अखेरच्या सत्रात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. पार्थिवपुढील अडचणी एकीकडे वाढत असताना शेष भारताच्या वृद्धिमान साहाने चिकाटीने खेळपट्टीवर पाय रोवत शतक झळकावले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. गुजरातच्या गोलंदाजीपुढे सुरुवातीला ४ बाद ६३ अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर शेष भारताचा संघ इराणी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या चौथ्या दिवशीच नामशेष होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कर्णधार चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान यांचा ‘साहा’रा मिळाल्यामुळे दिवसअखेर शेष भारताने ४ बाद २६६ अशी मजल मारली आहे.

क्रिकेटच्या अनिश्चिततेचा प्रत्यय इराणी स्पध्रेच्या चौथ्या दिवशी क्रिकेटरसिकांना आला. शेष भारताची सुरुवातीची अवस्था पाहता पाचव्या दिवसापर्यंत सामना लांबणार नाही, असे वाटत होते. मात्र कसोटी क्रिकेटमधील चिवट फलंदाजीचा अनुभव असलेल्या पुजारा आणि साहाला हे नामंजूर होते. गुजरातचे प्रारंभी अवघड वाटणारे ३७९ धावांचे आव्हान मग दिवसअखेर खुजे वाटायला लागले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद २०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. आता मंगळवारी अखेरच्या दिवशी शेष भारताला विजयासाठी ११३ धावा हव्या आहेत, तर गुजरातला ऐतिहासिक रणजी विजेतेपदापाठोपाठ इराणी चषकावर नाव कोरण्यासाठी उर्वरित सहा फलंदाज लवकर बाद करण्याची आवश्यकता आहे.

तब्बल सव्वाचार तास खेळपट्टीवर उभा राहणाऱ्या साहाने २१४ चेंडूंत १६ चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांसह आपली नाबाद १२३ धावांची खेळी साकारली. चिंतन गाजाला लाँग ऑफला चौकार खेचून त्याने आपले शतक पूर्ण केले आणि भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचा जणू इशाराच दिला आहे. त्याला साथ देणारा पुजारा ८३ धावांवर खेळतो आहे.

गेल्या वर्षी इराणी सामन्याच्या पहिल्या डावात सहाशे धावांपर्यंत मजल मारणाऱ्या मुंबईचा दुसरा डाव लवकर आटोपला. मग ४८० धावांचे लक्ष्य शेष भारताने अनपेक्षितपणे पेलले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा यंदा अनुभवायला मिळणार का, हे उत्सुकतेचे आहे.

सामन्यानंतर आपल्या झुंजार खेळीबद्दल साहा म्हणाला, ‘‘कोणतेही दडपण न घेता गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करण्याची रणनीती मी आखली आणि ती यशस्वी ठरली. माझ्यात आणि पार्थिवमध्ये कोणतीही वैयक्तिक स्पर्धा नाही. दोघेही आपला खेळ उंचावण्यासाठी खेळतो.’’

संक्षिप्त धावफलक

  • गुजरात (पहिला डाव) : ३५८
  • शेष भारत (पहिला डाव) : २२६
  • गुजरात (दुसरा डाव) : ९०.३ षटकांत सर्व बाद २४६ (प्रियांक पांचाळ ७३, चिराग गांधी ७०; शाहबाझ नदीम ४/५३, सिद्धार्थ कौल ३/७०)
  • शेष भारत (दुसरा डाव) : ८४ षटकांत ४ बाद २६६ (वृद्धिमान साहा खेळत आहे १२३, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ८३; हार्दिक पटेल २/५९).

साईट स्क्रिनचा वाद

चेतेश्वर पुजारासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या अतिरिक्त  साईट स्क्रीनबाबत वाद उद्भवल्यामुळे सामन्याचा काही वेळ वाया गेला. पुजाराला आवश्यक असलेला अतिरिक्त साइट स्क्रीन गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने पंचांच्या निदर्शनास आणून दिला. खेळण्याची स्थिती ही संपूर्ण सामन्यात सारखीच असावी लागते, या नियमाचा आधार घेत पार्थिवने हा आक्षेप घेतला होता. त्यामुळे पंचांनी त्वरित तो काढून टाकण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सामना सुरू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rest of india wriddhiman saha hundred

ताज्या बातम्या