एकतर्फी विजय अपेक्षित असलेल्या भारताला जागतिक हॉकी लीगमधील पुरुषांच्या लढतीत गुरुवारी आर्यलडविरुद्ध ४-४ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. भारतासाठी हा मोठा धक्का ठरला.
साखळी गटातील पहिल्या लढतीत भारताकडून रुपींदरपाल सिंग याने ४०व्या व ६५व्या मिनिटाला गोल केले. आकाशदीप सिंग व शिवेंद्र सिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. आर्यलडकडून अॅलन सोर्थेन, पीटर कारुथ, कानोर हार्ते व अँड्रय़ू मॅकॉनोर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
पूर्वार्धात आकाशदीप सिंग याने २२व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. मात्र ही आघाडी अल्पकाळ ठरली. त्यानंतर तीनच मिनिटांनी आर्यलडच्या अॅलन सोर्थेन याने गोल करीत १-१ अशी बरोबरी केली. हा गोल झाल्यानंतर आर्यलडने सातत्याने चाली केल्या. ३०व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची हुकमी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत पीटर कारुथने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. याच गोलच्या आधारे त्यांनी पूर्वार्धात २-१ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीलाच भारताने जोरदार चाल केली. त्यामध्ये मिळालेल्या संधीचा लाभ घेत रुपींदरने सुरेख फटका मारून गोल केला आणि २-२ अशी बरोबरी केली. या गोलमुळे भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढला. त्यानंतर सात मिनिटांनी शिवेंद्र सिंगने गोल करीत ३-२ अशी आघाडी मिळविली. भारताला केवळ १० मिनिटेच आघाडीचा आनंद मिळाला. ५७व्या मिनिटाला कानोरने जोरदार चाल करीत गोल केला व ३-३ असा गोलफलक केला. भारतीय संघावर दडपण ठेवत आयर्लंडने आणखी एक गोल नोंदविला. ६४ व्या मिनिटाला त्यांच्या अँड्रय़ूने भारतीय बचाव रक्षकांना चकविले आणि संघास ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला रुपींदर हा भारताच्या मदतीस धावून आला. त्याने गोल करीत ४-४ अशी बरोबरी केली.
भारतीय महिला संघाची निराशाजनक सुरुवात
रॉटरडॅम : विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय महिला संघाला जागतिक हॉकी लीगमधील पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने त्यांचा ७-० असा धुव्वा उडविला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडने भारतीय खेळाडूंविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजविले. पूर्वार्धात त्यांनी ४-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. चालरेटी हॅरीसन हिने आठव्या मिनिटाला त्यांचे खाते उघडले. त्यानंतर भारताने स्वत:वरच गोल केला. कॅटी ग्लेन (२६ वे मिनिट) व सियान फ्रेमॉक्स (३१ वे मिनिट) यांनी आणखी गोल करीत न्यूझीलंडची बाजू बळकट केली. हॅरिसन (५२ वे मिनिट) व ग्लेन (६९ वे मिनिट) यांनी उत्तरार्धात प्रत्येकी आणखी एक गोल केला. क्रिस्टल फोर्गेसन हिने ५३ व्या मिनिटाला गोल केला. भारतास शुक्रवारी १३ व्या मानांकित बेल्जियमशी खेळावे लागणार आहे तर न्यूझीलंडपुढे जर्मनीचे आव्हान असेल.