Virat Kohli and World Cup 2023: भारत तब्बल १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. शेवटच्या वेळी २०११मध्ये, भारताने श्रीलंका आणि बांग्लादेशसह एकत्र या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी भारताची एकट्याने या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताचा महान फलंदाज विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक असेल. क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा आहे की, त्याचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याचे मानले जात आहे. त्याचा खास मित्र वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला याबाबत विचारले असता त्याने स्पष्ट नकार दिला. यानंतर विराट आणखी एक विश्वचषक खेळू शकेल, असा विश्वास गेलला आहे.
विराट कोहली २०११मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. त्यावेळी त्याचे वय २३ वर्षे होते. २०१५ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघाचा कोहलीही सदस्य होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. यानंतर २०१९मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. जर रविचंद्रन अश्विनची वर्ल्डकप संघात निवड झाली नाही तर २०११च्या विश्वविजेत्या संघाचा एकमेव सक्रिय सदस्य म्हणून कोहली यावेळी विश्वचषकात खेळेल.
काय म्हणाला वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू ख्रिस गेल?
कोहली त्याच्या कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणार आहे आणि त्याचा खास मित्र ख्रिस गेलला वाटते की. विराटमध्ये आणखी एक विश्वचषक खेळण्याची क्षमता आहे. माजी दिग्गज कॅरेबियन खेळाडू गेल एका मुलाखतीत म्हणाला, “विराट कोहलीचा अजून एक विश्वचषक बाकी आहे. मला वाटत नाही की हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल. त्याच्या जवळील संधी कमी झाल्या आहेत असं वाटत नाही.” विश्वचषक स्पर्धेतील यजमानांच्या संधींबद्दल बोलताना गेल म्हणाला की, “भारत जिंकण्यासाठी नेहमीच फेव्हरिट असतो, विशेषत: जेव्हा ते घरच्या मैदानावर खेळत असतो.”
विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल म्हणाला, “भारत ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार आहे. यावेळी ते घरच्या मैदानावर खेळत आहे. ही स्पर्धा अतिशय रंजक असणार आहे. बीसीसीआय भारतीय संघाची निवड कशी करणार आहे? ते आम्हाला खरोखर पाहायचे आहे. कारण, सर्व प्रथम ते संघ निवडणार आहेत. बरेच युवा खेळाडू संघाचा दरवाजा ठोठावत आहेत. मायदेशात भारत नेहमीच विजयाचा प्रबळ दावेदार असतो. त्यामुळे भारतीय संघावरही दडपण निश्चितच असेल.”
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे
भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ते १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध सुपरहीट सामना खेळणार आहे. या स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्याच वेळी, अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उद्घाटन आणि अंतिम दोन्ही सामने अहमदाबादमध्येच खेळवले जातील.