स्विस पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेले फिफाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांचा निर्लज्जपणा शुक्रवारी साऱ्या जगाने पाहिला. अत्यंत थकवा जाणवत असल्यामुळे वॉर्नर यांची तुरुंगातून तात्पुरती सुटका करण्यात आली. मात्र, अवघ्या एका तासात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पार्टीत सहभाग घेतला आणि नृत्यही केले. वॉर्नर यांच्यावर आठ गुन्हय़ांची नोंद आहे.
‘‘गेल्या ३० वर्षांपासून जर मी फिफाचे पैसे चोरत होतो, तर मला ते पैसे कोण देत होते? मग त्यांना अटक का करण्यात आली नाही?’’ असा उलट प्रश्न वॉर्नर यांनी प्रसारमाध्यमांना केला. २०११ साली भ्रष्टाचार केल्याच्या आरोपामुळे वॉर्नर यांना फिफाने दूर केले होते. मात्र वॉर्नर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ब्लाटर यांच्यावरही आरोपपत्र दाखल केले पाहिजे का, या प्रश्नावर वॉर्नर म्हणाले, ‘‘हो. जर मला आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्ही उभे करत असाल, तर गेली २४ वष्रे ब्लाटर आमचे अध्यक्ष आहेत. मी फिफाचा कोषाध्यक्ष नव्हतो, फिफासाठी मी धनादेश काढत नव्हतो. जर मी भ्रष्टाचारी असेल, तर ब्लाटर यांना मोकळे सोडणे चुकीचे ठरेल.’’