भारत वि. इंग्लंड दुसरा कसोटी सामना बर्मिंगहममध्ये खेळवला जाणार आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे संघाच्या कोचने सांगितलं आहे.
बुमराह इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांपैकी ३ सामनेच खेळणार आहे. यामुळे बुमराह दुसरा कसोटी सामना खेळणार नसल्याची चर्चा होती. पण आता संघाच्या कोचने बुमराह दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती दिली आहे. २ जुलैपासून दोन्ही संघांमधील कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेट म्हणाले, तो खेळण्यासाठी उपलब्ध आहे. आम्हाला सुरुवातीपासूनच माहित आहे की तो पाचपैकी फक्त तीन सामने खेळणार आहे. अर्थातच गेल्या कसोटीनंतर रिकव्हर होण्यासाठी त्याच्याकडे आठ दिवस होते. पण परिस्थिती, वर्कलोड आणि पुढील चार सामने आम्ही कश्याप्रकारे मॅनेज करू शकू, याचा विचार करता आताच कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताच्या सराव सत्रात बुमराह नेहमीप्रमाणे गोलंदाजी करताना दिसला. दुसरी कसोटी २ जुलै रोजी एजबेस्टन, बर्मिंगहम येथे खेळवला जाईल. बुमराहच्या गोलंदाजीचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
टीम इंडियाचे सहाय्यक कोच म्हणाले, “इतर खेळाडूंचा वर्कलोडबाबत माहिती घेत आम्ही बुमराहबाबत निर्णय घेऊ. पण तसं पाहता हो तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे.” भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकाने माहिती दिली की बुमराह पूर्णपणे फिट आहे आणि त्याला दुखापत होण्याची कोणतीही भिती नाही.
रायन डोशेट म्हणाले, “बुमराह खेळण्यासाठी तयार आहे. पण हे चार कसोटी बुमराहच्या खेळण्याच्या दृष्टीने कसे मॅनेज करू यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे जर आम्हाला वाटत असेल की त्याला या कसोटीत खेळण्याची आवश्यकता आहे, तर आम्ही शेवटच्या क्षणी हा निर्णय घेऊ. मी खेळपट्टी कशी असेल याबद्दल बोलत आहे. बुमराहला लॉर्ड्स आणि कदाचित मँचेस्टर किंवा ओव्हलवरील सामन्यासाठी थांबवायचं का? तर ते या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे.”
कोच डोशेट यांच्या वक्तव्यानंतर आता जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, किंवा तो खेळणार नसेल तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.