कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ‘पाॅवरप्ले’चा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून यात तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे मत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला उद्या, बुधवारी प्रारंभ होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अतिशय आक्रमक शैलीत खेळण्यासाठी ओळखला जातो. त्यांचा ‘पॉवरप्ले’मध्ये अर्थात सुरुवातीच्या सहा षटकांत अधिकाधिक धावा करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांना रोखायचे झाल्यास बुमराची कामगिरी निर्णायक ठरेल असे सूर्यकुमारला वाटते.

‘‘आम्ही एकदिवसीय मालिका आणि त्याआधी ट्वेन्टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला खेळताना पाहिले आहे. त्यांच्याविरुद्ध ‘पॉवरप्ले’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या टप्प्यात त्यांना रोखणे आव्हानात्मक ठरू शकते. मात्र, बुमराने अलीकडेच झालेल्या आशिया चषकात ‘पॉवरप्ले’मध्ये किमान दोन षटके टाकत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. तो इतकी जबाबदारी घेऊन खेळतो हे पाहून छान वाटते. सुरुवातीच्या षटकांत ऑस्ट्रेलियाला रोखणे सोपे नसेल, पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू,’’ असे सूर्यकुमारने सांगितले.

बुमराला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. आता तो ट्वेन्टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सूर्यकुमार म्हणाला. ‘‘बुमराने स्वत:साठी एक स्तर निश्चित केला आहे. मोठ्या मालिकेसाठी कशाप्रकारे तयारी करायची हे त्याला ठाऊक आहे. आमच्या सध्याच्या संघात बुमरालाच ऑस्ट्रेलियात खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे अन्य खेळाडू त्याच्याशी संवाद साधून बऱ्याच गोष्टी समजून घेत आहेत. तो सहकाऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानांवर खेळताना बुमरासारखा गोलंदाज खूप महत्त्वाचा ठरतो. तो संघात असणे आम्हाला निश्चित फायदेशीर ठरेल,’’ असे सूर्यकुमारने नमूद केले. तसेच ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवरही भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह खेळण्याचे सूर्यकुमारने संकेत दिले आहेत. ‘‘आम्ही यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत खेळलो, त्यावेळी अंतिम ११ खेळाडूंत एक वेगवान गोलंदाज, एक अष्टपैलू आणि तीन फिरकीपटूंना खेळवले होते. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीही साधारण सारखीच आहे. येथील खेळपट्ट्यांवरही चेंडूला उसळी मिळते. त्यामुळे संघाच्या रचनेत फारसा बदल करणार नाही,’’ असे सूर्यकुमारने सांगितले.