भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळत असलेल्या वागणुकीमुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी आपला हा संताप व्यक्त करताना पाकिस्ताने यापुढे भारताशी खेळण्यावर कायमचा बहिष्कार टाकावा, असे आवाहनही केले आहे. पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध क्रिकेट सीरिज खेळायला तयार आहे. मात्र, दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजकीय तणावामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी भारत-पाक यांच्यात क्रिकेट सामने खेळवण्यास उत्सुक नाहीत.
गेल्या काही वर्षांमध्ये हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत. मात्र, भारताचा आडमुठेपणा पाहता पाकिस्तानने यापुढे त्यांच्याशी खेळण्यावर बहिष्कार टाकावा. त्यामुळे आयसीसीचे मोठे आर्थिक नुकसान होईल. कदाचित तेव्हा भारत पाकिस्तानशी खेळायला तयार होईल. जशास तसे प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ आहे. जर भारत क्रिकेटच्या मैदानावर आमच्याशी असलेले संबंध पुन्हा जोडण्यास इच्छूक नसेल पाकिस्तानलाही भारतासोबत क्रिकेट सामने खेळायची गरज नाही. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांमध्येही पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्यावर बहिष्कार टाकावा, असे केल्यास आयसीसीचे मोठे आर्थिक नुकसान तर होईलच, याशिवाय त्या स्पर्धेचे महत्त्वही कमी होईल. तेव्हाच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला सन्मानाची वागणूक मिळेल आणि आम्ही समान व्यासपीठावर स्वत:ची बाजू मांडू शकू, असे जावेद मियाँदाद यांनी ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
तसेच आयसीसीने केवळ बीसीसीआयला खूश करण्यासाठी क्रिकेट दौरे किंवा सामन्यांच्या आयोजनावर पैसे खर्च करून काहीही साध्य होणार नाही. हाच पैसा पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी खर्च करावा. जर आयसीसी भारताला आमच्याशी खेळण्यासाठी राजी करू शकत नसेल तर आम्हीदेखील भारतासोबत का खेळायचे , असा सवाल मियाँदाद यांनी उपस्थित केला.