भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी -२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ४ वर्षांनंतर परतला आहे. ओमान आणि यूएईमध्ये भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ख्याती असणारा महेंद्रसिंह धोनी देखील भारतीय संघासोबत असणार आहे.

भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमसोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे. यंदाच्या टी -२० विश्वचषकामध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी धोनीला टी -२० विश्वचषकात मार्गदर्शक होण्यासाठी कसे तयार केले याचा खुलासा केला आहे. शाह यांनी संघ निवडीनंतर सांगितले की, “यासाठी आम्ही धोनी, कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनाशी बोललो आहोत आणि सर्वांनी याबद्दल सहमती दर्शवली आहे”. टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर शाह पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. “धोनीसोबत मी दुबईत बोललो. त्याने फक्त टी -२० विश्वचषकासाठी मार्गदर्शक होण्याचे मान्य केले आणि मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येकजण यावर सहमत आहे,” असे जय शाह यांनी सांगितले.

धोनीच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, भारताने दक्षिण आफ्रिकेत २००७ टी -२० विश्वचषक आणि भारतात २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक अशी दोन विश्वचषक विजेतेपदे जिंकली आहेत. अशा स्थितीत धोनीचा अनुभव भारतीय संघासाठी फायद्याचे ठरणार आहे. धोनीने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून धोनी आयपीएल वगळता सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर आहे.