ENG vs AUS, Ashes 2023: लंडनच्या किंग्स्टन ओव्हलवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. सामन्याचे दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर सामना दोलायमान स्थितीत दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाकडे जरी १२ धावांची नाममात्र आघाडी असली तरी सामन्यात काहीही होऊ शकते. याच सामन्या दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने स्लिपमध्ये शानदार झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जो रुटच्या या झेलचा व्हिडीओ इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. मार्क वूडच्या षटकातील चेंडूवर रूट स्लिपमध्ये उभा होता. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने ‘आउटसाईड द ऑफ स्टंप’ आउट स्विंग चेंडू टाकत  ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला चकवले आणि त्याच्या बटची किनार घेत चेंडू दुसऱ्या स्लिप आणि गलीच्या दिशेने वेगात जात असताना त्याने एका हाताने अप्रतिम झेल घेतला. त्याच्या या डायव्हिंग करून घेतलेल्या झेलचा व्हिडीओमध्ये सर्वकाही स्पष्ट दिसत आहे.

डाव्या हाताने घेतलेल्या रूटच्या या अफलातून झेलने मार्नस लाबुशेनची संथ खेळी संपुष्टात आली. लाबुशेनने तब्बल ८२ चेंडूत ९ धावा केल्या आणि शेवटी पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने लाबुशेनच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. पहिल्या डावातील ४३व्या षटकातील ५व्या चेंडूवर रुटने हा झेल शानदार झेल टिपला. जो रूटप्रमाणेच विराट कोहलीनेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एका हाताने डायव्हिंग करताना शानदार कॅच घेतला. अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावर विराट कोहली आणि जो रूटच्या ‘कॅच’ची तुलना केली जात आहे. दोघांनीही एका हाताने स्लिपमध्ये झेल पकडले आहेत.

दोन दिवसांनंतर सामन्याची स्थिती अशी आहे

अ‍ॅशेसच्या पाचव्या कसोटीचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ २८३ धावांत सर्वबाद झाला. संघासाठी हॅरी ब्रूकने ९१ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने ४, टॉड मर्फीने २ आणि जोश हेझलवूडने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय मिचेल मार्श आणि कर्णधार पॅट कमिन्स यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले.

प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ २९५ धावांत सर्वबाद झाला. स्टीव्ह स्मिथने ६ चौकारांच्या मदतीने संघाकडून ७१ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. जो रूट, मार्क वुड आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसनने एक विकेट घेत इतरांना साथ दिली.

हेही वाचा: Los Angeles Olympics: तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं होऊ शकते पुनरागमन! केवळ ५ संघांना संधी, भारताचा नंबर लागणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने पुढे आहे

पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी घेतली असून ट्रॉफीची दावेदारी कायम ठेवली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने भक्कम आघाडी घेतली होती. यजमान इंग्लंडने जरी तिसऱ्या सामन्यात निश्‍चितच पुनरागमन केले असले तरी चौथा सामना पावसाने वाया गेला होता. त्यामुळे इंग्लंडच्या हातातून अ‍ॅशेस ट्रॉफी निसटली. दुसरीकडे, इंग्लंड संघाने जरी शेवटचा कसोटी सामना जिंकला तरी मालिका २-२ अशी बरोबरीत राहील. गतवेळचा विजेता ऑस्ट्रेलिया असल्याने अ‍ॅशेसची ट्रॉफी त्यांच्याकडेच राहणार आहे.