Joe Root Vs Sachin Tendulkar : इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रुटने आर्यलॅंडविरोधात होत असलेल्या कसोटी सामन्यात ५६ धावांची खेळी खेळली. या इनिंगमध्ये रुटने कसोटी करिअरमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रुट अशी कामगिरी करणारा जगातील ११ वा फलंदाज ठरला आहे. रुटने ११ हजार धावा पूर्ण केल्या पण यामध्ये सर्वात खास गोष्ट आहे की, तो कसोटीत ११००० धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा युवा फलंदाज बनला आहे. ३२ वर्षांचा रुट १५३ दिवसांत हा कारनामा करण्यात यशस्वी झाला आहे. कसोटीमध्ये ११ हजार धावा करणारा युवा फलंदाज म्हणून एलिस्टेयर कूकच्या नावाची नोंद होती. त्याने ३१ वर्ष ३५७ दिवस इतक्या वयात ११ हजार धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला होता.
रुटला आता सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. जर रुटने अशाच प्रकारची अप्रतिम फलंदाजी केली, तर पुढच्या चार वर्षांत तो सचिनचा विक्रम मोडू शकतो. रुटने मागील अडीच वर्षात १२ शतके ठोकण्याची जबरदस्त कामगिरी केली आहे. आताच्या घडीला रुट कसोटी क्रिकेटमधील रनमशीन आहे.




कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात ११००० धावा पूर्ण करणारे खेळाडू
३१ वर्ष ३५७ दिवस – एलिस्टेयर कूक
३२ वर्ष १५३ दिवस – जो रूट
३४ वर्ष ९५ दिवस – सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरने कसोटीत १५.९२१ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रुटला आणखी ४९१८ धावा कराव्या लागतील. त्यामुळे रुटला त्याच्या फिटनेस आणि फॉर्ममध्ये सातत्य ठेवावं लागेल. रुटसाठी हे सोपं होणार नाही. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रुटला कमीत कमी ५० ते ६० कसोटी सामने खेळावे लागतील. रुटने आतापर्यंत १३० कसोटी सामने खेळले आहेत.