India vs England 3rd Test: लॉर्डसच्या मैदानावर सुरु असलेला कसोटी सामना हा इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटसाठी अतिशय खास ठरला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना जो रूटने दमदार शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. फलंदाजीत जोर लावल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण करत असताना त्याने स्लिपमध्ये करूण नायरचा भन्नाट एकहाती झेल घेतला. रूटने घेतलेला हा झेल विक्रमी ठरला आहे.
तर झाले असे की, इंग्लंडकडून २१ वे षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू करूण नायरच्या बॅटची कडा घेत जो रूटच्या हातात गेला. जो रूटने कुठलीही चूक न करता एका हाताने भन्नाट झेल घेतला. हा झेल पकडण्यासाठी त्याला डाईव्ह मारावी लागली. त्यानंतर त्याने एका हाताने झेल घेतला. हा झेल पंचांनी तपासून पाहिला, त्यानंतर आपला निर्णय दिला. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.
जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. रूटने आतापर्यंत २११ झेल टिपले आहेत. राहुल द्रविडच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २१० झेल टिपण्याची नोंद आहे. तर महेला जयवर्धनेने २०५ झेल पकडले होते. या यादीत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथचा देखील समावेश आहे. स्मिथने आतापर्यंत २०० झेल टिपले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणारे खेळाडू
२११ – जो रूट (१५६ सामने)
२१० – राहुल द्रविड ( १६४ सामने)
२०५ – महेला जयवर्धने (१४९ सामने)
२०० – स्टीव्ह स्मिथ ( ११७ सामने)
२०० – जॅक कॅलिस ( १६६ सामने)
१०६ – रिकी पाँटिंग (१६८ सामने)
इंग्लंडचा पहिला डाव
या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर नितीश कुमार रेड्डी, सिराजने प्रत्येकी २–२ आणि जडेजाने एक गडी बाद केला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रूटने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली. तर जॅक क्रॉलीने १८, बेन डकेटने २३, ओली पोपने ४४, हॅरी ब्रुकने ११, बेन स्टोक्सने ४४, जेमी स्मिथने ५१, ख्रिस वोक्स ०, ब्रायडन कार्स लेन ५६, जोफ्रा आर्चरने ४ धावा केल्या आणि शोएब बशीर १ धावेवर नाबाद राहिला.