जपान ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीदरम्यान ट्रॅक्टर कारला आदळून झालेल्या अपघातानंतर मॉरुसिया संघाचा ड्रायव्हर ज्युलेस बिआंची याला सलग तिसऱ्या दिवशी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मायकेल शूमाकरप्रमाणेच बिआंचीला मेंदूचा आजार झाला असल्यामुळे त्याच्या तब्येतीत मंद गतीने सुधारणा होत असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
या आजारातून बिआंची कधीही पूर्णपणे सावरू शकत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, बिआंचीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक जण देवाकडे प्रार्थना करत आहेत. योकाईची येथील माय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिआंचीसाठी योग्य उपचार पुरवण्यात येत असून आता त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे, असे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल संघटनेचे (फिया) वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर गेरार्ड सालियन्ट यांनी सांगितले.
‘‘बिआंचीची तब्येत लवकरच सुधारेल, अशी आशा आहे. पण तो यापुढेही कधीही फॉम्र्युला-वन कार चालवू शकणार नाही. मृत्यूशी लढा देणाऱ्या बिआंचीला यातून बाहेर पडण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे,’’ असे ‘फिया’चे अध्यक्ष जॉन टॉड यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी सोची येथे होणाऱ्या रशियन ग्रां. प्रि. शर्यतीसाठी मॉरुसिया संघाच्या गॅरेजवर ज्युलेस बिआंचीचे नाव लावण्यात आले आहे. प्रत्येक शर्यतीसाठी संघाच्या दोन ड्रायव्हर्सची नावे गॅरेजवर लावण्यात येतात. या शर्यतीसाठी बिआंची उपलब्ध नसला तरी त्याचे नाव न हलवण्याचे मॉरुसिया संघाने ठरवले आहे.