भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि विराट कोहली यांनी एकत्र बसून चर्चा करावी, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. या दोघांनी भूतकाळ विसरून भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी काम करायला हवे, असेही कपिल देव म्हणाले. डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याबाबत विराट आणि गांगुली यांच्या विधानांमध्येही विरोधाभास दिसून आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराटने या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आकडेवारीनुसार कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
विराट कोहलीने कोणत्याही कारणास्तव कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्याने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे आणि त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असे कपिल देव यांचे मत आहे.

द वीक मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाले, ”आजकाल तुम्हाला अनेक गोष्टींमुळे आश्चर्य वाटत नाही. जेव्हा त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हा त्याच्या मनावर खूप दडपण आले असावे. मग आम्ही वाचले आणि ऐकले की त्याने कर्णधारपद सोडावे असे कुणालाच वाटत नव्हते. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, आपण त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.”

हेही वाचा – VIDEO : ‘‘गांगुलीलासुद्धा वर्ल्डकप जिंकता आला नाही…”, रवी शास्त्रींचा विराटला उघड पाठिंबा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिल म्हणाले, “त्यांनी आपापसात हा मुद्दा सोडवायला हवा होता. तुम्ही एकमेकांना फोन करा आणि चर्चा करा. देश आणि संघ सर्वात प्रथम आला पाहिजे. सुरुवातीला मला जे हवे होते, ते मिळाले. पण कधी कधी काहीच मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्णधारपद सोडावे. यामुळे तो पायउतार झाला असेल, तर मला काय बोलावे तेच कळत नाही. तो एक अप्रतिम खेळाडू आहे. मला त्याला फलंदाजी करताना आणि धावा करताना पाहायचे आहे. आणि तेही विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये.”