केपटाऊन : यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत फिरकी गोलंदाज निर्णायक ठरतील, असे मत दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने व्यक्त केले.‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे संयुक्तपणे पार पडणार आहे. या स्पर्धेदरम्यान खेळपट्टी अधिक चांगल्या असतील आणि सीमारेषा जवळ असतील. त्यामुळे गोलंदाजीत विविधता आणि नियंत्रण असणारे फिरकी गोलंदाज संघात असणे आवश्यक असेल,’’असे केशव म्हणाला.
या स्पर्धेद्वारे अनेक फिरकी गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल, अशी आशा धरायला हरकत नाही. क्रिकेटच्या प्रत्येक प्रारूपात खेळताना त्या क्रिकेट पद्धतीत खेळण्यासाठी आवश्क असलेला घरचा अभ्यास परिपूर्ण असल्यामुळे मी यशस्वी होऊ शकलो, असे सांगून केशवने आता दक्षिण आफ्रिकेतून फिरकी गोलंदाजांची पुढील पिढी तयार करण्याची मनीषा व्यक्त केली. जर, या दक्षिण आफ्रिकेतून मी फिरकी गोलंदाजांची भावी पिढी निर्माण करू शकलो, तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असेल.
