कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नईत २२७ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वात हा भारताचा सलग चौथा पराभव ठरला आहे. काही दिवसांपूर्वी विराटच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. काही तज्ज्ञांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी विराट कोहलीऐवजी अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व द्यावं, असाही सल्ला दिला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही यामध्ये आपलं मत मांडलं आहे. कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, असं स्पष्ट मत पीटरसन यानं मांडलं आहे.

विराट कोहली कर्णधार असताना भारताने सलग चार कसोटी सामने गमावल्यामुळे त्याच्या नेतृत्वक्षमतेबाबत चर्चा ऐरणीवर आहे, परंतु कोहलीच्या नेतृत्वाला कोणताच धोका नसल्याचा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने केला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारती संघाने मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने गमावले, मग ऑस्ट्रेलियात अ‍ॅडलेड कसोटीत आणि इंग्लंडविरुद्ध चेन्नईत मानहानीकारक पराभव पत्करले. ‘‘भारताच्या कसोटी कर्णधार पदाबाबतची चर्चा टाळणे कठीण आहे, परंतु परिस्थिती बदलणार नाही,’’ असे पीटरसनने सांगितले.

आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकणाऱ्या इंग्लंडनं आपल्या संघात चार महत्वाचे बदल केले आहेत. जोफ्रा आर्चर, अँडरसन आणि जॉस बटलर यांना आराम देण्यात आला आहे.

अक्षरला संधी; वॉशिंग्टन संघाबाहेर?

रवींद्र जडेजाच्या जागी पहिल्या कसोटीतच अक्षर पटेल पदार्पण करणार हे निश्चित झाले होते, परंतु दुखापतीमुळे तो खेळू न शकल्यामुळे शाहबाज नदीमला संधी मिळाली. अक्षर आता दुखापतीतून सावरून दुसऱ्या कसोटीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे रविचंद्रन अश्विनच्या साथीला अक्षर आणि सहा कसोटींचा अनुभव असलेला कुलदीप यादव यांचा समावेश केला जाऊ शकतो. या स्थितीत फिरकी गोलंदाजीत अपयशी ठरलेला, पण चिवट फलंदाजी करणारा वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर जाऊ शकतो. चेपॉकच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे.