दोन दिवसांपूर्वी भारताचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. हा प्रजासत्ताक दिन अधिक खास होता कारण हा देशाच्या स्वातंत्र्याचं हे ७५ वं वर्ष होतं. या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी काही व्यक्तींना विशेष पत्र लिहून त्यांचे आभार मानले होते. परदेशी असूनही भारताबद्दल विशेष प्रेम असणाऱ्या काही नामांकित व्यक्तींना पंतप्रधानांनी चिठ्ठी लिहून त्यांचे आभार मानले होते. यामध्ये ख्रिस गेल, जॉण्टी रोर्ड्स यासारख्या खेळाडूंचा समावेश होता. या शिवाय पंतप्रधान मोदींनी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनलाही विशेष चिठ्ठी पाठवून त्याला भारताबद्दल असणारं प्रेम आणि सन्मान यासाठी त्याचे आभार मानले होते.

मोदींनी चिठ्ठीत काय म्हटलं आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीटरसनला लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मोदींनी यापूर्वी तुम्ही ज्या प्रकारे भारतीयांना सहकार्य केलंय तसेच पुढेही करत राहाल अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केलीय. “प्रिय, केविन पीटरसन, भारतामधून तुम्हाला नमस्कार. २६ जानेवारी रोजी दरवर्षी आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा तो दिवस आहे ज्या दिवशी संविधानासंदर्भातील बऱ्याच मोठ्या चर्चेनंतर भारताचं संविधान आजपासून अंमलात आलं. ती तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो. यंदाचा २६ जानेवारी फारच खास आहे. कारण या वर्षी आम्ही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत आहोत. त्यामुळे मी तुम्हाला आणि भारताबद्दल प्रेम असणाऱ्या इतर मित्रांना भारताबद्दलचं प्रेम आणि आपुलकी कायम रहावी म्हणून हे पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. मला अपेक्षा आहे की तुम्ही नेहमीच आमच्या देशासोबत आणि येथील लोकांसोबत एकत्र येऊन काम करत राहाल,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय.

हिंदीचं केलं कौतुक…
“क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही जे काही मिळवलं आहे त्या आठवणी आजही आमच्या स्मृतीमध्ये अगदी ताज्या आहेत. तुमचं भारतासोबत आणि येथील लोकांसोबत असणारं नातं फारच सुंदर आहे. तुम्ही हिंदीत केलेले ट्विट पाहून मला फार आनंद होतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यात तुम्हाला भेटण्याची मी वाट पाहत आहे,” असंही मोदींनी या चिठ्ठीमध्ये पुढे म्हटलं आहे.

पीटरसन काय म्हणाला?
मोदींनी पाठवलेल्या चिठ्ठीचा फोटो पीटरसनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअऱ केलाय. त्याने यासोबत हिंदीमध्ये एक मेसेजही लिहिलाय. “आदरणीय मोदीजी, मुझे लिखे गए खत में अविश्वसनीय रूप से जिस तरह की भावना आपने जताई है, उसके लिए बहुत-बहुत धन्यवाद. २००३ में भारत में कदम रखने के बाद से मुझे हर यात्रा पर आपके देश से और प्यार हो गया. भारत में वन्यजीवों की रक्षा के लिए आप जो कुछ भी कर रहे हैं, उसके लिए आपको धन्यवाद देने के लिए व्यक्तिगत रूप से मिलने का और इंतजार नहीं कर सकता हूं,” अशी कॅप्शन पीटरसनने हा फोटो शेअर करताना दिलीय. पंतप्रधान मोदींनी आपल्या चिठ्ठीत पीटरसनने केलेल्या हिंदीमधील ट्विटचा उल्लेख केल्याने पीटरसनने हिंदीत रिप्लाय दिल्याचं बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या पीटरसन खेळतोय सामने…
सध्या मस्कतमध्ये खेळवल्या जात असणाऱ्या लीजेंट्स लीग क्रिकेटमध्ये पीटरसन खेळत आहे. तो वर्ल्ड जायंट्स या टीमकडून खेळतोय. दोन दिवसांपूर्वीच त्याने एशिया लायन्स संघाविरोधात खेळताना ३८ चेंडूंमध्ये ८६ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान पीटरसनने श्रीलंकाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्याच्या एका षटकामध्ये ३० धावा काढल्या होत्या. ४१ वर्षीय पीटरसनने आपल्या या खेळीच ७ षटकार आणि ९ चौकार लगावले.