भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत घसघशीत वाढ करणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव, तर क्रीडापटू, संघटकांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. तिसरे जीवन गौरव पुरस्कार विजेते आदिल सुमारीवाला परदेशात असल्यामुळे पुरस्कार स्विकारू शकले नाहीत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा संचालक सुहास दिवसे यांच्यासह अनेक आजी माजी क्रीडापटू उपस्थित होते.

हेही वाचा : अन्वयार्थ: खाशाबांच्या राज्यात..

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये एका तास उशिराने झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या पारितोषिक रकमेच्या वाढीच्या घोषणमुळे पुरस्कार स्विकारण्यासाठी सकाळपासून उपस्थित राहिलेल्या पुरस्कार्थींचा सगळा शिणवटा पळून गेला. क्रीडामंत्री संजय बनसोडेंनी प्रास्ताविकातून पुढील वर्षीपासून पारितोषिक रकमेत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी आपल्या भाषणात पुरस्काराच्या रकमेत पुढील वर्षीपासून कशाला, या तीन वर्षांच्या पुरस्कारांपासूनच एकूण २ कोटी ३८ लाख रुपये ही वाढीव रकम मंजूर करण्याची आपली तयारी असल्याचे जाहीर केले. फक्त यासाठी मुख्यमंत्र्याची परवानगी हवी, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीची चावी तुमच्याकडेच आहे. खेळाडूंसाठी खर्च होणार असेल, तर परवानगी कसली मागता जरूर करा, असे सांगून पुरस्कार रकम वाढविण्यास एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

“हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. नीरज चोप्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा दिवस भाला फेक दिवस म्हणून साजरा करतात. मग आपण मागे का?” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हा उपस्थित सभागृहात टाळ्याचा कडकडाट झाला.

“क्रीडा क्षेत्रासाठी आजीवन खर्च करणाऱ्या श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर आणि आदिल सुमारीवाला यांच्यासह राज्यातील क्रीडा गुणवत्तेचा सन्मान करताना आनंद होत आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

यावेळी उपस्थित राज्यपाल रमेश बैस यांनी खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करताना मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईला यातून बाहेर काढण्यासाठी शाळा, महाविद्यालयातून एक तास खेळाचा अनिवार्य करण्याची सूचना केली. तसेच पारंपरिक खेळाचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याबद्दल खंतही व्यक्त केली. राज्याची क्रीडा गुणवत्ता वाढवविण्यासाठी माजी खेळाडू आणि पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यात यावा, असे मतही बैस यांनी मांडले.

हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत”, संभाजीराजेंच्या विधानावर रोहित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी वाढणार पारितोषिक रक्कम

आतापर्यंत जीवन गौरव पुरस्कारासाठी ३ लाख, तर क्रीडा पुरस्कारासाठी १ लाख रोख पारितोषिक दिले जात आहे. कार्यक्रमात करण्यात आलेल्या घोषणेनुसार आता ही रक्कम जीवन गौरवासाठी ५ आणि क्रीडा पुरस्कारासाठी ३ लाख इतकी वाढवण्यात आली. ही वाढीव रक्कम या थकीत तीन वर्षाच्या पुरस्कारापासूनच देण्यात येणार आहे.