India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने इंग्लंडवर आघाडी घेतली आहे. या डावात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. पण त्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसल्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिलने मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून ४१७ चेंडूंचा सामना करत १८८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह दोघांच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
केएल राहुल – शुबमन गिलची विक्रमी भागीदारी
याआधी इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना एका भागीदारीदरम्यान सर्वाधिक चेंडू खेळून काढण्याचा विक्रम हा संजय मांजरेकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता. या दोघांनी लीड्स कसोटीत फलंदाजी करताना २००२ मध्ये १७० धावांची भागीदारी करताना ४०५ चेंडू खेळून काढले होते. आता गिल आणि राहुलच्या जोडीने ४१७ चेंडू खेळून काढले आहेत. या विक्रमी भागीदारीसह २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे.
गिलचं दमदार शतक, केएल राहुलचं शतक हुकलं
केएल राहुलने या डावात भारतीय संघाचा डाव सांभाळला. तो शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्याचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. तो ९० धावांवर बाद होऊन माघारी परतला. शतकाच्या जवळ असताना बेन स्टोक्सने त्याला पायचीत करत माघारी धाडलं.
शुबमन गिलचं दमदार शतक
केएल राहुलचं शतक थोडक्यात हुकलं. पण शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने या डावात २२८ चेंडूंचा सामना करून आपलं शतक पूर्ण केलं. पहिल्या डावात ३५८ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने इंग्लंडवर आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडने घेतलेली आघाडी पूर्ण करत भारतीय संघाने आता इंग्लंडवर आघाडी घेतली आहे. केएल राहुल आणि शुबमन गिल जोडी बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि साई सुदर्शन या जोडीने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून दमदार शतकी भागीदारी केली.