गेल्या वर्षभराच्या कालावधीत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल जोडीने भारताच्या रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा जोडीला मागे टाकत संघातलं आपलं स्थान पक्क केलं आहे. एकेकाळी आश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकणारे फलंदाज आज कुलदीपच्या जाळ्यात अकडत आहेत. दुखापत आणि ढासळलेल्या फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या आश्विनचं संघातलं पुनरागमन आता जवळपास कठीण मानलं जात आहे. खुद्द प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. परदेशी खेळपट्ट्यांवर कुलदीप सर्वोत्तम फिरकीपटू असल्याचं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं आहे.

परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये कुलदीपने 5 बळी घेऊन दाखवले आहेत. त्यामुळे यापुढे बाहेरील खेळपट्ट्यांवर आमची पहिली पसंती ही कुलदीपला असेल. जर संघात दोन फिरकीपटू घेण्याची वेळ आली तर कुलदीप त्यापैकी एक असेल. अजुनही प्रत्येकाला संघात स्थान मिळवण्याची संधी आहे (आश्विनच्या ढासळलेल्या फॉर्मबद्दल उद्देशून) मात्र आताच्या घडीला कुलदीप हा आमचा परदेशी खेळपट्ट्यांवर सर्वोत्तम फिरकीपटू आहे. रवी शास्त्री Cricbuzz संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीमध्ये कुलदीपने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती खरंच वाखणण्याजोगी होती. यापुढे परदेश दौऱ्यात मनगटी फिरकीपटूंचा बोलबाला असेल, त्यामुळे कुलदीप हा आमचा सध्याच्या घडीला पहिल्या पसंतीचा आणि सर्वोत्तम फिरकीपटू असेल.” रवी शास्त्रींनी कुलदीप यादवचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही 4-1 च्या फरकाने जिंकली. यानंतर टी-20 मालिकेत विजय मिळवून परदेश दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे.