अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसची भूमिका

भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने निवृत्तीचे वृत्त फेटाळले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे पेसने म्हटले आहे. पुढच्या वर्षी चेन्नई खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावयाचे असून नव्या सहकाऱ्यासह ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी आतूर असल्याचे पेसने स्पष्ट केले.

२०१७पासून पेसने ब्राझीलच्या आंद्रे सा याच्यासह खेळायला सुरुवात केली, मात्र चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत या जोडीला सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई स्पर्धेची सहा जेतेपदे पेसच्या नावावर आहेत.

‘‘मी खेळतच राहणार आहे. सोमदेवच्या निवृत्तीनंतर मला निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. कधीतरी थांबण्याची वेळ येईल. कदाचित एका महिन्यानंतर किंवा सहा महिन्यांनी, असे मी म्हटले होते. त्यावरून मी निवृत्त होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, परंतु तो चुकीचा होता. टेनिसप्रती असलेली आवड जराही कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेसाठी मी अद्यापही सज्ज आहे,’’ असे पेसने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘आंद्रे सा ३९ वर्षांचा आहे. मात्र त्याच्या बरोबरीने ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे. मेहनतीला पर्याय नाही. वय हा अडथळा नाही. मी तंदुरुस्त आहे आणि ते पुरेसे आहे.’’

दिविज-पुरव जोडीला शाबासकी

सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का देणाऱ्या दिविज शरण आणि पुरव राजा जोडीचे पेसने भरभरून कौतुक केले. दिविजने अफलातून सव्‍‌र्हिस केली. आमच्याविरुद्ध लढतीसाठी ते रणनीती ठरवून आले होते आणि त्यानुसारच त्यांनी खेळ केला. ही जोडी सातत्याने सुधारणा करते आहे. त्या दोघांची शैली परस्परभिन्न आहे. त्यामुळे ते एकमेकांना पूरक खेळतात. त्यांनी एकत्र खेळत राहणे आवश्यक आहे.