गतविश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने दमदार पुनरागमन करत मर्सिडीज संघाचा सहकारी निको रोसबर्गवर कुरघोडी करून येथे पार पडलेल्या कॅनेडियन ग्रां. प्रि. शर्यतीत बाजी मारली. या जेतेपदासह हॅमिल्टनने यंदाच्या फॉम्र्युला-वन विश्वविजेत्या शर्यतपटूचा मान पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. हॅमिल्टनने १ तास ३१ मिनिटे व ५३.१४५ सेकंदांत ७० टप्पे पूर्ण केले. त्यापाठोपाठ रोसबर्गने २.२८५ सेकंदांचा अधिक वेळ नोंदवून दुसरे, तर विलियम्स संघाचा वॉल्टेरी बोट्टासने ४०.६६६ सेकंदांचा अधिक वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले.
दोन वेळा विश्वविजेत्याचा मान पटकावणाऱ्या हॅमिल्टनने सर्वाधिक ४४व्यांदा पोल पोझिशनपासून सुरुवात केली आणि सुरुवातीपासून आघाडी घेताना जेतेपदावर कब्जा केला. हॅमिल्टनने या जेतेपदासह सॅनिश आणि मोनॅको येथील शर्यतीत जेतेपद पटकावणाऱ्या रोसबर्गला हॅट्ट्रिकपासून वंचित ठेवले. फेरारीच्या किमी रैकोनेन आणि चार वेळा विश्वविजेत्याचा मान पटकावणाऱ्या सेबेस्टीयन वेटेलला अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.  
हॅमिल्टनचे कॅनडीयन ग्रां. प्रि. शर्यतीतील हा चौथे, तर कारकीर्दीतील ३७वे जेतेपद आहे. या विजयामुळे हॅमिल्टनने १७ गुणांची कमाई करत एकूण १५१ गुण पटकावले आहे. त्यापाठोपाठ १३४ गुणांसह रोसबर्ग दुसऱ्या स्थानावर आहे. ‘‘मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीनंतर मला या विजयाची आवश्यकता होती. मॉट्रीअल माझ्या आवडीचे ठिकाण आहे. मॉट्रीअल येथील ट्रॅक आणि या शहरावर माझे प्रेम आहे. पुन्हा अव्वल स्थानावर आल्याचा अत्यानंद होत आहे,’’ अशी प्रतिक्रिया हॅमिल्टनने जेतेपदानंतर दिली.
सहारा फोर्स इंडियाला चार गुण
निका हल्केन्बर्गने कॅनेडीयन ग्रां. प्रि. शर्यतीत आठवे स्थान पटकावून सहारा फोर्स इंडियासाठी चार गुणांची कमाई केली. त्याचा संघसहकारी सर्गिओ पेरेज याची गुण पटकावण्याची संधी थोडय़ाशा फरकाने हुकली आणि पेरेजला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले. सातव्या क्रमांकावरून स्पध्रेत सुरुवात करणाऱ्या हल्केन्बर्गला अखेरीस आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘‘ही शर्यत अत्यंत महत्त्वाची होती आणि मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला. वेटेलकडून कडवी टक्कर मिळाली,’’ अशी प्रतिक्रिया हल्केन्बर्गने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton eases to canadian gp win over nico rosberg
First published on: 09-06-2015 at 12:15 IST