Liam Dawson: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण फलंदाजांनी केलेल्या चुकांमुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. या सामन्यात शेवटची विकेट घेणारा गोलंदाज शोएब बशीर चर्चेत राहिला. बशीरने मोहम्मद सिराजला बाद करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. दरम्यान या विजयानंतर इंग्लंडचं टेन्शन वाढलं. कारण शोएब बशीरला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे.त्याच्याजागी लियाम डॉसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
शोएब बशीरला संपूर्ण सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण इंग्लंडला ज्यावेळी विकेटची सर्वात जास्त गरज होती, त्यावेळी त्याने विकेट काढून दिली. बशीरने टाकलेला चेंडू सिराजने खेळून काढला. पण हा चेंडू यष्टीला जाऊन धडकल्याने सिराजला आपली विकेट गमवावी लागली. इथेच भारताचा २२ धावांनी पराभव झाला. या सामन्यात गोलंदाजी करत असताना शोएब बशीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान देखील सोडावं लागलं होतं. मात्र, त्यानंतर त्याने मैदानात पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि संघाला विकेट मिळवून दिली. मात्र, या दुखापतीसह तो मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याला या मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी संधी मिळालेला डॉसन हा ८ वर्षांनंतर इंग्लंडकडून खेळताना दिसून येणार आहे. ३५ वर्षीय डॉसन २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले होते. यासह त्याला इंग्लंडकडून ६ वनडे आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हॅम्पशायर संघाचं प्रतिनिधित्व करतो. या संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २१२ सामन्यांमध्ये ३७१ गडी बाद केले आहेत. गोलंदाजीसह त्याने फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं आहे.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने १०००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १८ शतकं झळकावली आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, डॉसन आल्याने इंग्लंडच्या गोलंदाजीसह फलंदाजीतही भर पडणार आहे. बशीर केवळ गोलंदाजीत योगदान देत होता. मात्र डॉसन दोन्ही भूमिका बजावू शकतो.
भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गट एटकिंसन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग