बार्सिलोनाला सर्वोत्तम संघाचा पुरस्कार

पदकांची अनेक शिखरे पादाक्रांत करून फुटबॉल विश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी याच्या शिरपेचात सोमवारी आणखी एक तुरा रोवला गेला. मेस्सीला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘ग्लोब सॉकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर बार्सिलोनाने वर्षांतील सर्वोत्तम संघाचा मान पटकावला.

‘‘हा पुरस्कार स्वीकारताना अत्यानंद होत आहे, परंतु संघाशिवाय हे शक्य नाही, हे मी नेहमी म्हणत आलो आहे. हे अविश्वसनीय वर्ष आहे,’’ अशी प्रतिक्रिया मेस्सीने दिली.

बार्सिलोनाने २०१५च्या हंगामात स्पॅनिश लीग, कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग, युरोपियन सुपर चषक आणि क्लब विश्वचषक अशा पाच स्पर्धाचे जेतेपद पटकावले. स्पॅनिश सुपर चषक स्पध्रेत त्यांना अ‍ॅटलेटिको बिलबाओ संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने वर्षांतील सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रम हुकला. बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विल्मोट्स यांना सर्वोत्तम व्यवस्थापकाचा़, तर बेनफिकाला सर्वोत्तम अकादमी क्लबचा पुरस्कार देण्यात आला. तसेच इटलीचा आंद्रेआ पिर्लो व इंग्लंडचा फ्रँक लॅम्पर्ड यांना दीर्घकालीन सेवेबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेते

सर्वोत्तम खेळाडू : लिओनेल मेस्सी

सर्वोत्तम क्लब : बार्सिलोना

सर्वोत्तम अध्यक्ष : जोसेप मारिया बाटरेमेउ (बार्सिलोना)

कारकीर्द पुरस्कार : फ्रँक लॅम्पर्ड (इंग्लंड) व आंद्रेआ पिर्लो (इटली)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोत्तम प्रशिक्षक : मार्क विल्मोट्स (बार्सिलोना)