लिव्हरपूल : गतविजेत्या लिव्हरपूलने बॉर्नमाउथ संघाला ४-२ असे पराभूत करीत प्रीमियर लीग फुटबाॅलमध्ये विजयी प्रारंभ केला. या विजयाने त्यांनी दिओगो जोटाला आदरांजली वाहिली. सामन्याला लिव्हरपूलने जोरदार सुरुवात केली. ३७ व्या मिनिटाला हुगो एकिटिकेने गोल करीत संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर कोडी गाकपोने (४९व्या मि.) गोल झळकावत संघाची आघाडी २-० अशी केली.
यानंतर अँटोइन सेमेन्योने (६४व्या मि. व ७६व्या मि.) १२ मिनिटांमध्येच दोन गोल करीत बॉर्नमाउथला २-२ अशी बरोबरी साधूल दिली. सामन्याच्या ८८व्या मिनिटाला लिव्हरपूलला आघाडी वाढविण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून फेडेरिको चिएसाने (८८व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला भेदत संघाला ३-२ असे आघाडीवर नेले. यानंतर भरपाई वेळेत तारांकित खेळाडू मोहम्मद सलाहने गोल करीत संघाची आघाडी ४-२ अशी केली.
लिव्हरपूलने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत विजय नोंदवला. सामन्याच्या २८ व्या मिनिटाला लढत काही काळ थांबविण्यात आली. बॉर्नमाउथचा आघाडीपटू सेमेन्योनेने पंच अँथनी टेलरकडे आपल्यावर चाहत्याकडून वर्णद्वेषी टीका होत असल्याचे सांगितले. टीका करणाऱ्या व्यक्तीला ओळखण्यात आल्याची माहिती नंतर संघ व्यवस्थापकाकडून देण्यात आली.
दिओगो जोटाला आदरांजली
गेल्या पाच वर्षांतील लिव्हरपूलचा लोकप्रिय खेळाडू दिओगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचे तीन जुलैला झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतरचा संघाचा हा पहिला सामना होता. सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांनी पोर्तुगालच्या या दोन्ही खेळाडूंसाठी हातात ‘डीजे २०’ आणि ‘एएस ३०’ असे फलक घेतले होते. दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून हातात काळी पट्टी बांधण्यात आली. सलाहने गोल केल्यानंतर जोटाप्रमाणे आनंद साजरा केला. तसेच, सामना संपल्याची शिटी वाजल्यानंतर सलाहला अश्रू अनावर झाले.