मिलिंद ढमढेरे

क्लॅरेन्स लोबो, द्रोणाचार्य पुरस्कार

क्रीडा क्षेत्रात काही वरिष्ठ प्रशिक्षक असे असतात की त्यांना पुरस्कार, मानसन्मान, पैसा व प्रसिद्धी मिळवण्याबाबत फारशी रुची नसते. त्यांना आपल्याला मोठेपण देणाऱ्या क्रीडा क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने काम करणे व अनेक खेळाडू घडवणे, हेच जीवनाचे आद्यकर्तव्य वाटत असते. क्लॅरेन्स लोबो हे हॉकी प्रशिक्षक अशाच मुलखावेगळ्या प्रशिक्षकांमध्ये मानले जातात.

केंद्र शासनाने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देत त्यांचा वैयक्तिक नव्हे तर हॉकी क्षेत्राचाच गौरव केला आहे.

हॉकी हा राष्ट्रीय खेळ असला तरीही अपेक्षेइतके या खेळाच्या विकासावर गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. त्यातही २५ वर्षांमध्ये २० पेक्षा जास्त लोकांनी भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. या पाश्र्वभूमीवर लोबो यांनी भारतीय हॉकी क्षेत्रासाठी दिलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे. केवळ मुंबई व महाराष्ट्राच्या संघांमधील खेळाडूंकरिता नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपल्या प्रशिक्षक कौशल्याचा ठसा उमटवला आहे. भारतीय कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन्ही संघांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. १९९३पासून प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची सर्व शिदोरी देण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. एका मोठय़ा कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून प्रामाणिकपणे नोकरी करीतच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू घडवले आहेत. संघातील खेळाडू हे आपले एक कुटुंबीयच आहेत असे मानून त्यांनी आजपर्यंत प्रत्येक खेळाडूशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण केले आहे. खेळाडूच्या वैयक्तिक अडचणींचा बारकाईने अभ्यास करून त्या अडचणींवर मात करण्यासाठीही त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. खेळाडूची मानसिक तंदुरुस्ती चांगली असेल तरच तो मैदानावर शंभर टक्के कामगिरी करू शकतो, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवतच त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. खेळाडू व प्रशिक्षक यांच्यात कसा चांगला सुसंवाद पाहिजे, हे त्यांच्याकडूनच शिकले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१०मध्ये अझलन शाह चषक स्पर्धा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली आहे. पुन्हा दोन वर्षांनी या स्पर्धेत भारताला रौप्यपदक त्यांनी मिळवून दिले आहे. २०११मध्ये आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतास सुवर्णपदक मिळाले होते. २०१३च्या जागतिक लीग दुसरी फेरी विभागातही भारतास विजेतेपद मिळवून देण्यात त्यांच्या प्रभावी प्रशिक्षण शैलीचा सिंहाचा वाटा होता. त्याखेरीज अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ते प्रशिक्षक असताना भारतास पदकांवर नाव कोरता आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेळाडूंचे यश हाच आपला पुरस्कार आहे असे ते नेहमी मानतात. त्यामुळेच की काय द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अर्ज करणे त्यांना मान्य नव्हते. परंतु धनराज पिल्ले, सरदार सिंग, संदीप सिंग, पी.आर. श्रीजेश, वीरेन रस्किना आदी खेळाडूंच्या आग्रहाखातर त्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज पाठवला. त्यामुळेच हॉकी क्षेत्रातील नि:स्वार्थी कार्यकर्त्यांचा सन्मान झाला आहे.