भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती आणि कर्णधार पदावरून पायउतार झाला असला तरी त्याचा चाहता वर्ग अजूनही कायम आहे. धोनीची एक झलक मिळण्यासाठी चाहत्यांची काहीही करण्याची तयारी असते. धोनीच्या कारचा पाठलाग करणारेही चाहते आपण याआधी पाहिले आहेत. क्रिकेट विश्वात यशाचे शिखर गाठले असले तरी आपले पाय अजूनही जमिनीवर असल्याचे धोनीच्या वर्तणुकीतून दिसून आले आहे. आपल्या चाहत्यांची धोनी वेळोवेळी दखल घेत असतो.

धोनी सध्या झारखंड संघाकडून विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळत आहे. धोनीसारखा अनुभववीर संघात असल्याने झारखंडने यावेळी स्पर्धेत अफलातून कामगिरी करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दिल्लीत झालेल्या सामन्यात झारखंडसमोर विजयासाठी १५९ धावांचे आव्हान होते आणि त्याचा पाठलाग करताना संघाने चार विकेट्स गमावल्या होत्या. झारखंडचा फलंदाज बाद झाला की स्टेडियमवर ‘धोनी..धोनी’ असा जयघोष होत होता. धोनीने आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आपल्या बॅटने उपस्थितांचे मनोरंजन केले. षटकार ठोकून धोनीने सामना जिंकला. दरम्यान, एका चाहत्याने सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून धोनीकडे धाव घेतली आणि त्याचे चरणस्पर्श केले. आपल्या चाहत्याला धोनीने ऑटोग्राफ देखील दिला.

 

याआधी देखील एका चाहत्याने अशाच प्रकारे भर सामन्यात स्टेडियममध्ये धाव घेऊन धोनीची भेट घेतली होती. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात धोनीने भारतीय संघाचे शेवटचे नेतृत्त्व केले. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला होता. याच सामन्यात हा किस्सा घडला होता. धोनीच्या पाया पडण्यासाठी चाहता मैदानात धावत आल्यानंतर पंचांनी त्याला खेळपट्टीवर पाय न ठेवण्यासाठी बजावले होते. त्यावेळी धोनीने खेळपट्टीवरून उडी मारण्याचे निर्देश दिले होते आणि भेट घेऊ दिली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी चाहत्याला मैदानाबाहेर नेले आणि सामना पुन्हा सुरू करण्यात आला होता.