न्यूयॉर्क : जागतिक बुद्धिबळ महासंघ अर्थात ‘फिडे’कडून खेळाडूंना जीन्स परिधान करून खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर जगातील अव्वल बुद्धिबळपटू असलेल्या मॅग्नस कार्लसनने जागतिक अतिजलद (ब्लिट्झ) अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. पेहरावसंहितेचे (ड्रेसकोड) उल्लंघन केल्याने पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनला जागतिक जलद (रॅपिड) स्पर्धेबाहेर करण्यात आले होते. यासह त्याच्यावर २०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला होता.
स्पर्धेच्या पेहरावसंहितेनुसार (ड्रेसकोड) जीन्स परिधान करण्यास परवानगी नाही. कार्लसनला नियमानुसार कपडे परिधान करून येण्यास सांगितले. मात्र, त्याने तसे करण्यास नकार दिला. पेहरावसंहितेत बदलाची घोषणा करताना जागतिक बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्कादी द्वार्कोविच म्हणाले,‘‘कपडे परिधान करण्यासंबंधित निर्णय घेण्यासाठी मी ‘फिडे’ अधिकाऱ्यांना खेळाडूंना सवलत देण्याच्या दृष्टीने प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. पेहरावसंहितेचे आताही पालन करावेच लागेल. मात्र, त्यामध्ये थोडा बदल करण्याची (जॅकेटसह जीन्स) परवानगी देण्यात आली आहे. मॅग्नस कार्लसन जागतिक अतिजलद (ब्लिट्झ) अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे.’’
कार्लसनने स्पर्धेदरम्यान ‘फिडे’चे उपाध्यक्ष व भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची भेट घेतली. ‘‘फिडे’ कार्लसन व जागतिक बुद्धिबळ समुदायासह मिळून ‘फिडे’ स्पर्धांमध्ये खेळाडू आणि चाहत्यांना सर्वश्रेष्ठ अनुुभव देण्याच्या दृष्टीने सदैव तत्पर राहील,’’ असे ‘फिडे’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘मी न्यूयॉर्कमध्ये कमीत कमी एक दिवस आणखी खेळणार आहे. चांगला खेळलो तर, कदाचित आणखी एक दिवस. ‘फिडे’ अध्यक्ष द्वार्कोविच यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. मी स्पर्धेबाबत त्यांच्याशी चर्चा केली,’’ असे कार्लसन म्हणाला. आनंद यांच्यानुसार ‘फिडे’कडे कार्लसनवर कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण, त्याने नियमाचे पालन करण्यास नकार दिला होता.
हम्पीच्या कामगिरीकडे लक्ष
जागतिक जलद (रॅपिड) अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवल्यानंतर कोनेरू हम्पीचे आता ‘फिडे’ जागतिक अतिजलद (ब्लिट्झ) अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचे लक्ष्य आहे. हम्पीने इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरला नमवत जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. हम्पीने २०१९मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या स्पर्धेतही जेतेपद पटकावले होते. स्पर्धेच्या खुल्या गटात १३ तर, महिला गटात ११ फेऱ्या पार पडतील. अतिजलद स्पर्धेत भारताची द्रोणावल्ली हरिकाकडेही अनेकांचे लक्ष असेल. तर, आर.वैशाली व दिव्या देशमुखकडून कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे. वैशाली व दिव्याला जलद स्पर्धेत चमक दाखवता आली नव्हती. खुल्या गटात कार्लसन जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल. कार्लसनसमोर भारताचा आर. प्रज्ञानंद व अर्जुन एरिगेसी, फ्रान्सचा अलिरेझा फिरूझा व उजबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांचे आव्हान असेल. जलद स्पर्धेत जेतेपदापासून दूर राहिलेल्या एरिगेसीचे लक्ष्य २०२६ कॅन्डिडेट्स (आव्हानवीर) स्पर्धेच्या पात्रतेकडेही असेल.
‘फिडे’च्या जबाबदारीसाठी आनंद पात्र नाही – कार्लसन
जलदगती बुद्धिबळ स्पर्धेच्या जागतिक लढतीत पेहरावसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने सर्वोत्तम खेळाडू असूनही विश्वानाथन आनंद ‘फिडे’मधील उच्च जबाबदारीसाठी पात्र नाही, अशी टीका केली आहे. ‘‘भारताचे विश्वनाथन आनंद सध्या ‘फिडे’मध्ये उपाध्यक्ष आहेत. पेहरावसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मला अपात्र ठरवणे हा निर्णय योग्य नव्हता. ‘फिडे’चे पदाधिकारी एखाद्या यांत्रिक मानवासारखे काम करतात. आनंद त्यामधील एक असून, त्याला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही,’’ असे कार्लसन म्हणाला.