Divya Deshmukh Chess Champion: जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धेत, नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने अंतिम फेरीत ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत विश्वविजेतेपद जिंकले आहे. १९ वर्षीय दिव्या देशमुखने टायब्रेकरमध्ये गेलेल्या सामन्यात उत्कृष्ट चाली खेळत हम्पीवर विजय मिळवला.
दरम्यान, दिव्या देशमुखच्या या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राच्या आणि नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली आहे. ती पहिली किशोरवयीन खेळाडू आहे, जीने या स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन जेतेपद मिळवले आहे. यापूर्वीदेखील तिने भारतासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. तिने आतापर्यंत जवळपास ३५ पदके जिंकली असून, त्यापैकी २३ सुवर्ण पदके आहेत.”
फडणवीस पुढे म्हणाले, “दिव्याने कोनेरू हम्पी यांना पराभूत केले आहे. मी त्यांचेही अभिनंदन करतो. त्या ही चांगल्या खेळाडू आहेत. पण नागपूर आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही निश्चितपणे तिचा सन्मान करू. ज्यांनी भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे, अशा खेळाडूंचा योग्य सन्मान झाला पाहिजे. म्हणून मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्याशी चर्चा करून कशा प्रकारे तिचा सन्मान करायचा, हे ठरवू.”
दरम्यान, दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषकाचे जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. १९ वर्षीय दिव्या ही तिची प्रतिस्पर्धी असलेल्या अनुभवी हम्पीच्या निम्म्या वयाची आहे. कोनेरू हम्पी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर आहे. हम्पी ग्रँडमास्टर झाल्यापासून, फक्त दोन भारतीय महिलांनीच ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. विजयानंतर दिव्याने दिग्गजांच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे.
सोमवारी, पहिला गेम अनिर्णित राहिल्यानंतर, हम्पीच्या चुकीमुळे दिव्याने दुसरा टायब्रेकर गेम जिंकला. हम्पी आणि दिव्या यांच्यातील पहिले दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले. शनिवारी झालेल्या पहिल्या डावात दिव्या पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होती आणि तिच्याकडे सामना जिंकण्याची चांगली संधी होती. तिने चांगली रणनीती आखली होती आणि पटावर स्पष्ट आघाडी घेतली होती. मात्र शेवटी, काही चुकीच्या चाली खेळल्यामुळे हम्पीला सामना पुन्हा बरोबरीवर आणण्याची संधी मिळाली.