MPL 2025 Bizarre Runout Video Viral: सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ चे सामने खेळवले जात आहेत. या सामन्यात रायगड रॉयल्स वि. पुणेरी बाप्पा यांच्यात ७ जूनला सामना खेळवला जात होता. या सामन्यात एक जबरदस्त रनआऊट पाहायला मिळाला. विकेटकिपरच्या एका थ्रोने दोन्ही बाजूच्या स्टम्पसवरील बेल्स उडवल्या. याचा व्हीडिओ आता व्हारल होत आहे.
या सामन्यात यष्टीरक्षकाच्या एका थ्रोने दोन्ही बाजूंचे स्टम्प उडाले. त्यामुळे नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असलेला फलंदाज धावबाद झाला. अशा प्रकारचा धावबाद पाहून मैदानात उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि पंच थक्क झाले. व्हायरल व्हीडिओ पाहताच सुरूवातीलाही काही कळत नाही की नेमकं कोण आऊट झालं, पाहूया नेमकं काय घडलंय…
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ च्या सहाव्या सामन्यात २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रायगड रॉयल्सने डावाच्या पाचव्या चेंडूवर पहिली विकेट गमावली. संघाचा सलामीवीर फलंदाज हर्ष मोगवीराला खातेही न उघडता विचित्र पद्धतीने धावबाद करण्यात आले. रायगड रॉयल्सकडून सिद्धेश वीर आणि हर्ष मोगवीरा सलामीसाठी उतरले. पुणेरी बाप्पा संघाचा रामकृष्ण घोष पहिले षटक टाकत होता.
पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर, सिद्धेशने मागच्या बाजूला फटका खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. पुणेरीचा यष्टीरक्षक सूरज शिंदेने धावत जाऊन चेंडू टिपला आणि स्टम्पच्या दिशेन फेकून मारला. बॉल स्टम्पवर आदळला, पण तोपर्यंत सिद्धेश क्रीजवर परतला होता. स्टम्पला लागल्यानंतर, चेंडू नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरील स्टम्पलाही लागला. त्यावेळी तिथे उभा असलेला हर्ष मोगावीरा क्रीजच्या बाहेर होता, ज्यामुळे तो धावबाद झाला. हे दृश्य पाहून मैदानात उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. याचा व्हीडिओ मात्र व्हायरल होत आहे.\
पुणेरी बाप्पा संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २०२ धावा केल्या. यश नाहर (८२) आणि ऋषिकेश सोनवणे (५८) यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली तर विकेटकीपर फलंदाज सूरज शिंदेने १२ चेंडूत ५ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या. प्रत्युत्तरात, रायगड रॉयल्सचा संपूर्ण संघ १३.१ षटकांत १०३ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना ९९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुणेरी संघाकडून निकित धुमाळने सर्वाधिक ५ विकेट घेतले.