इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड

भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नव्या युगाचा आरंभ होणार आहे. इंग्लंडविरुद्ध आगामी एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी शुक्रवारी होणाऱ्या भारतीय संघ निवडीप्रसंगी नेतृत्वाची धुरा विराट कोहलीच्या समर्थ खांद्यांवर सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

बुधवारी रात्री धोनीने तडकाफडकी निर्णय घेत मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधारपदाचा त्याग केला. त्यामुळे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे करणाऱ्या कोहलीकडेच राष्ट्रीय निवड समिती कर्णधारपद सोपवण्याची शक्यता आहे. भारताच्या कर्णधारपदासाठी कोहलीशिवाय अन्य कोणताही योग्य पर्याय नसला तरी खेळाडूंना झालेल्या दुखापतींच्या पाश्र्वभूमीवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसाठी दोन संघ निवडताना निवड समितीची तारांबळ उडणार आहे.

धवनचे पुनरागमन होणार?

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईचे दोन महत्त्वाचे फलंदाज दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाहीत. त्यामुळे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध झाल्यास सूर हरवलेल्या शिखर धवनला संघात स्थान मिळू शकेल. के. एल. राहुलचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. कर्नाटकचा राहुल दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकला होता, दिल्लीकर फलंदाज धवनसुद्धा गेले काही महिने दुखापतीतून सावरत आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात डावखुरा फलंदाज धवन भारताकडून अखेरचा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर उर्वरित तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके त्याने साकारली होती.

चेन्नईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक त्रिशतक साकारणाऱ्या करुण नायरला रहाणेच्या जागी संघात स्थान मिळू शकते. धोनीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधारपदाचा जरी राजीनामा दिला असला, तरी खेळाडू म्हणून आपण उपलब्ध असल्याचे कळवले आहे.

अश्विनबाबत प्रश्नचिन्ह

भारताचा महत्त्वाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. इंग्लंडविरुद्ध भारताने मिळवलेल्या ४-० अशा ऐतिहासिक विजयात अश्विनचा सिंहाचा वाटा होता. मात्र याच मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे तो तामिळनाडूकडून रणजी स्पध्रेत खेळू शकला नाही. त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या वेळीसुद्धा त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारताचा दुसरा ऑफ-स्पिनर जयंत यादव दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यामुळे सामन्यातील तंदुरुस्ती सिद्ध करण्याची अट शिथिल करून या दोघांपैकी कुणाला संधी मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाला विश्रांती देऊन डावखुऱ्या फिरकीची मदार अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती. परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जडेजा एकदिवसीय संघात परतू शकेल. त्यामुळे अमित मिश्रालासुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे.

मनीष पांडे आणि केदार जाधवसह मनदीप सिंग एकदिवसीय संघातील आपले स्थान कायम राखू शकतील. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. सध्या धवल कुलकर्णीसुद्धा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे अनुभवी इशांत शर्मासोबत जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळू शकतील.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पंडय़ाला दुखापत झाली होती. मात्र सध्या डी. वाय. पाटील ट्वेन्टी-२० करंडक क्रिकेट स्पध्रेत तो खेळतो आहे. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते. सुरेश रैनाला ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.