‘मागणी तसा पुरवठा’ हा अर्थशास्त्रातील सिद्धांत सध्या क्रीडाविश्वात तंतोतंत वापरला जात आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) हे या सिद्धांताचे उत्तम उदाहरण. आयपीएलच्या निमित्ताने त्याने भारतीय क्रीडा क्षेत्रात शिरकाव केला आणि आता तो कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल, कबड्डी आदी खेळांतही वापरला जाऊ लागला. या खेळांनी लीग संस्कृतीला सुरुवात केली आणि मुळ खेळाच्या स्वरूपाला कमी-अधिक प्रमाणात धक्का पोहोचवला आहे. फुटबॉलमध्येही लीग संस्कृती बरीच वष्रे अस्तित्वात असली तरी ‘फाइव्ह-ए साइड’ आणि फुटसाल हे खेळाचे छोटेनेखानी स्वरूप शहरांमध्ये लोकप्रियतेच्या उंबरठय़ावर आहेत.
५ एप्रिल २०१६ रोजी पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू लुइस फिगोने ‘प्रीमिअर फुटसाल’ (प्रत्येकी पाच खेळाडूंचा संघ) लीगची घोषणा केली. त्या वेळी स्पर्धेबाबत सुरू झालेला अधिकृत/अनधिकृत हा वाद वर्षभरानंतरही सुरू आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) पुन्हा एकदा या स्पध्रेला आमची मान्यता नसल्याची घोषणा केली, परंतु या वेळी त्याही पुढे एक पाऊल टाकत या लीगच्या धर्तीवर स्पर्धा आयोजित करणार असल्याचा मानसही बोलून दाखवला. ‘फाइव्ह-ए साइड’ अशा नावानेही फुटबॉलचा एक लहान भाऊ प्रचलित आहे. या खेळात ४५-४५ मिनिटांच्या दोन सत्रांऐवजी २०-२० मिनिटांचे दोन सत्र खेळवण्यात येतात. आता हा फुटबॉलचा ट्वेन्टी-२० प्रकार खेळाला कोणत्या उंचीपर्यंत घेऊन जाईल, ही चर्चा ऐरणीवर आहे.
गेल्या वर्षभरात फुटसाल प्रीमिअर लीगने भलेही यशाची उंची गाठली नसली तरी हा फुटबॉलचा प्रकार सगळय़ांच्या पसंतीला उतरला आहे. विशेषत: कॉर्पोरेट संस्कृतीत हे छोटे स्वरूप चांगलेच रुजले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम आणि शनिवार-रविवार साप्ताहिक सुटीचा आस्वाद उपभोगणारी ही संस्कृती तंदुरुस्तीच्या बाबतीतही सजग आहे. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सतत काही तरी नवीन युक्त्या या संस्कृतीत उदयास येत असतात. प्रीमिअर फुटसालच्या निमित्ताने या संस्कृतीला सुचलेल्या युक्तीने क्रीडा व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. फुटसालला (५ खेळाडूंचा संघ) फुटबॉलचा लहान भाऊ असे आपण संबोधू शकतो. लहान जागेत फुटबॉलच्या आनंदासह शारीरिक तंदुरुस्तीसाठी फुटसालने आपले महत्त्व प्रस्थापित केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील हा छंद व्यावसायिकांनी अचूक हेरून मुंबईतील बरेच मॉल, शाळा यांमधील लहानशा जागेत फुटसालची मैदाने तयार करण्यात आली आहेत. तासाला हजार रुपयांपासून ते तीन-चार हजारांपर्यंत मोजावे लागत असूनही कॉर्पोरेट क्षेत्रातील आणि युवा वर्ग या प्रकाराकडे आकर्षित होत आहेत.
‘फाइव्ह ए साइड’ स्पर्धा
कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेळ घालवण्यासाठी किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी फुटसालचा पर्याय आहे. मात्र फाइव्ह ए साइडच्या स्पर्धाही आता भरवल्या जाऊ लागल्या आहेत. नुकतीच नेयमार ज्यु. फाइव्ह ए साइड अजिंक्यपद राष्ट्रीय स्पर्धा पार पडली आणि त्यात आठ विभागांतून मुंबई व हैदराबाद यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. हैदराबादने जेतेपद पटकावले. अशा अनेक फाइव्ह ए साइड स्पर्धा जिल्हा स्तरावरही खेळवण्यात येत आहेत.
वेळेनुसार पैसे मोजा
या मैदानांवर खेळण्यासाठी नोंदणी करता येते आणि दिलेल्या वेळेच्या पर्यायांनुसार पैसे मोजावे लागत आहेत. उदाहरणार्थ सकाळी ९ ते ११ या वेळेत तासाला १००० ते १५००, ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हाच दर २ ते ३ हजार आणि सायंकाळी ५ ते रात्री १० हा दर ४ हजारापर्यंत जातो, अशी माहिती मुंबईतल्या काही मॉल्समध्ये संपर्क साधल्यानंतर समोर आली आहे. विशेष म्हणजे नोंदणीसाठी या शाळा, मॉल्सच्या वेबसाइट्सही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
फुटसालला मान्यता नाही
फुटसाल खेळाला संघटनात्मक मान्यता नाही. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने फुटसाल संघटनेला अवैध ठरवले आहे. या खेळाच्या स्पर्धेत खेळणारा खेळाडू भारतातल्या फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरतो. गेल्या वर्षी फुटसाल खेळाची स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यात आली होती. फिगोसारख खेळाडू स्पर्धेशी संलग्न होता. मात्र या खेळाला मान्यताच नव्हती. ‘फाइव्ह अ साइड’ हा खेळ प्रामुख्याने मुंबई, गोवा अशा मोजक्या राज्यांमध्ये खेळला जातो. त्याचे स्वरुप प्राथमिक आहे. या खेळाची अखिल भारतीय पातळीवर संघटना नाही. परंतु तूर्तास फाइव्ह अ साइडला मान्यता आहे. या दोन खेळांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साम्य आहे, मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे दोन्ही खेळ विलग ठरतात. – उदयन बॅनर्जी, सचिव मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना.
फुटबॉलचा विकास कसा होणार?
जागतिक क्रमवारीत भारत २०० देशांमध्येही पिछाडीवर आहे. त्यात आपण फुटबॉल विश्वचषक खेळण्याची स्वप्न रंगवत आहोत. त्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जात आहेत, परंतु फुटसालच्या वाढत्या प्रसिद्धीने त्या प्रयत्नांना तडा जाण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यात आता भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघटना अर्थात एआयएफएफ यांनी फुटसालच्या धर्तीवर लीग सुरू करण्याच्या विचाराधीन असल्याचे सांगून फुटबॉल अभ्यासकांच्या चिंतेत भर पाडली आहे. जेथे फुटबॉलचा विकास झालेला आहे, तेथे पर्याय म्हणून फुटसाल खेळणे उचित समजले जाते, परंतु भारत अजून बराच पिछाडीवर असल्याने हा अट्टहास का?
नियमावली
- ‘फाइव्ह अ साइड’ खेळात मैदानाच्या बाजूला रिबाऊंड बोर्ड असतो. चेंडू सतत खेळता राहून मैदानातच रहावा, यासाठी ही योजना केलेली असते. फुटसालमध्ये मात्र फुटबॉलप्रमाणे क्रीडांगणाच्या टोकाला रेषा असतात. चेंडू क्रीडांगणाबाहेर गेल्यास किकने तटवून पुन्हा खेळ सुरू होतो.
- दोन्ही खेळांमध्ये प्रत्येकी पाच खेळाडू असतात. मात्र फुटसालमध्ये बदली खेळाडूंची संख्या सातपर्यंत वाढू शकते. यामुळे फुटसाल अत्यंत वेगवान होतो. ‘फाइव्ह अ साइड’मध्ये बदली खेळाडूंची संख्या मर्यादित असते.
- दोन्ही खेळांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या चेंडूचे आकारमान भिन्न असते. ‘फाइव्ह अ साइड’ खेळात फुटबॉलसारखा चेंडू असतो. फुटसालचा चेंडू लहान असतो आणि सामान्य चेंडूपेक्षा उसळी घेण्याची क्षमता ३० टक्क्यांनी कमी असते.
- फुटसालमध्ये पेनल्टी क्षेत्रात जाण्याची खेळाडूंना अनुमती असते. ‘फाइव्ह अ साइड’मध्ये मात्र पेनल्टी क्षेत्रातला खेळाडूंचा वावर मर्यादित असतो.
- फुटसालमध्ये फाऊल्स अर्थात स्वैर फटक्यांची संख्या मर्यादित असते. ‘फाइव्ह अ साइड’मध्ये असे बंधन नसते.