वेस्ट इंडिजविरुद्ध आज तिसरा एकदिवसीय सामना

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने १०५ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे शुक्रवारी होणारी एकदिवसीय लढत जिंकून भारतीय संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेने दमदार शतक झळकावले होते. सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहली यांनीही दमदार फलंदाजी केली होती. पण या तिघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चमक दाखवता आलेली नाही. भारतीय संघ आता २०१९च्या विश्वचषकासाठी संघबांधणी करत असून युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या कामगिरीवर साऱ्यांची नजर असेल. या दोघांना आतापर्यंत मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. त्याच्याकडून सातत्यपूर्ण भेदक मारा पाहायला मिळत आहे. पण फिरकीपटू आर. अश्विनला मात्र अजूनही छाप पाडता आलेली नाही. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही भेदक मारा करता आलेला नाही. गेल्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने तीन बळी मिळवले होते, त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून संघाला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.

वेस्ट इंडिजच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. बऱ्याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराचा जास्त अनुभवही दिसत नाही. शाई पोहने गेल्या सामन्यात एकहाती खिंड लढवली होती, पण अन्य फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे त्याला संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर वेस्ट इंडिजच्या संघाला मेहनत घेण्याची गरज आहे. दोन्ही संघांचा विचार करता वेस्ट इंडिजपेक्षा भारताचे पारडे नक्कीच जड आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार) अजिंक्य रहाणे, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, उमेश यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
  • वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्रो बिशू, रॉस्टन चेस, मिग्युएल कमिन्स, कायले होप, शाई पोह, अलझारी जोसेफ, इव्हिन लुइस, जेसन मोहम्मद, अ‍ॅश्ले नर्स, किरॉन पॉवेल, रोव्हमन पॉवेल.
  • वेळ : संध्याकाळी ६.३० वा. पासून. थेट प्रक्षेपण : टेन स्पोर्ट्स वाहिनी.