शनिवारी सरावादरम्यान बास्केटबॉल खेळत असताना ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड याचा गुडघा दुखावल्यामुळे भारताविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेडच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. रविवारी वेडच्या दुखापतीचा अहवाल सादर केला जाईल. पण यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनचा राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे.‘‘मॅथ्यू वेडच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याला प्रचंड वेदना होत आहेत. रविवारी त्याच्या गुडघ्याचा एमआरआय काढण्यात आल्यानंतर दुखापतीचे स्वरूप लक्षात येईल. रविवारी सकाळी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या सराव शिबिरात त्याने भाग घेतला नाही,’’ असे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रसिद्धी व्यवस्थापक मॅट केनिन यांनी सांगितले. हैदराबाद येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातही हनुवटीला झालेल्या दुखापतीमुळे वेडच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.