संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : नुकत्याच झालेल्या महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत माया सोनवणेने व्हेलोसिटी संघाकडून खेळताना आपल्या वेगळय़ा गोलंदाजीच्या शैलीने लक्ष वेधून घेतले. व्हेलोसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने मायाला गोलंदाजीसाठी चेंडू सोपवल्यानंतर तिची गोलंदाजीची शैली पाहून सर्वजण अवाक झाले. तिची दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल अ‍ॅडम्सशीही तुलना झाली. मात्र, हा केवळ योगायोग असल्याचे माया सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय मी बाळगले असून त्यासाठीच मेहनत घेत आहे, अशी भावनाही नाशिकची लेग-ब्रेक गोलंदाज मायाने व्यक्त केली.

मी कोणाचे अनुकरण करत नसून नैसर्गिकरीत्याच माझी गोलंदाजीची शैली अ‍ॅडम्सप्रमाणे असल्याचे मायाने स्पष्ट केले. ‘‘मी जेव्हापासून गोलंदाजी करते आहे, तेव्हापासून माझी अशीच शैली आहे. मी ही शैली कुठे शिकले नाही आणि कोणाच्याही शैलीचे अनुकरण केले नाही. माझी गोलंदाजी शैली अनेकांना क्लिष्ट वाटत असली तरीही मला आजवर कुठलीच अडचण आली नाही. मी गोलंदाजी करताना अनेकांनी तुझी शैली ही अ‍ॅडम्सची मिळती-जुळती असल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्र संघासाठी निवड झाल्यानंतर मला अ‍ॅडम्सच्या शैलीसोबत असलेल्या साम्याबाबत कळाले,’’ असे मायाने सांगितले. 

क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याच्या प्रेरणेचे श्रेय मायाने थोरल्या भावाला दिले. ‘‘मी वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेट खेळण्यासाठी माझ्या भावाने पुढाकार घेतला आणि त्याने कायम मला प्रोत्साहन दिले,’’ असे माया म्हणाली.

मायाने नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये सराव करण्यास सुरुवात केली. २०१३-१४ मध्ये आंतर-जिल्हा स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर तिला महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिला पहिल्या हंगामात सामने खेळण्यास मिळाले नाहीत, पण पुढील हंगामात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिची वरिष्ठ संघात वर्णी लागली. मायाने भारत ‘अ’ संघाकडून खेळताना वरिष्ठ महिला एकदिवसीय चॅलेंज चषक स्पर्धेचे जेतेपदही मिळवले. नुकत्याच झालेल्या महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेतील अनुभवाबाबत ती म्हणाली, ‘‘महिला ट्वेन्टी-२० चॅलेंजमध्ये खूप काही शिकण्यास मिळाले. अनेक अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. संघातील सर्व खेळाडूंनी मला चांगली कामगिरी करण्यासाठी पाठबळ दिले.’’

महिला ‘आयपीएल’ फायदेशीर!

महिला ‘आयपीएल’ सुरू करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हिरवा कंदील दिला आहे. या स्पर्धेमुळे भारतीय महिला खेळाडूंना खूप फायदा होईल, असे मायाने म्हटले आहे. ‘‘आगामी काळात ‘आयपीएल’ सुरू झाल्यास महिला क्रिकेटमध्ये आणखी वाढ होईल आणि या माध्यमातून खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठही मिळेल. भारतीय महिला खेळाडूंना अनेक परदेशी खेळाडूंसोबत खेळण्यास मिळाल्याने त्यांची गुणवत्ता वाढेल,’’ असे मायाने नमूद केले.