Indian Premier league History News : इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा सीजन ३१ मार्चपासून सुरु होत आहे. आगामी सीजनचा पूर्ण शेड्युल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी देशातील १२ स्टेडियममध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. या लीगमध्ये जगातील सर्वात चांगले खेळाडू प्रत्येकवर्षी मैदानात उतरत असतात. टी-२० फॉर्मेट चौकार-षटकारांचा खेळ समजला जातो. पण आज आम्ही तुम्हाला अशा ३ दिग्गज खेळाडूंबाबत सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयपीएल करिअरमध्ये एकही षटकार ठोकला नाही. या खेळाडूंना खूप चेंडू खेळण्याची संधी मिळाली, पण त्यांनी कधीही षटकार मारला नाही.
१) मायकल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण क्लार्कने आयपीएलमध्ये एकदाही षटकार ठोकला नाही. मायकल क्लार्क आयपीएलमध्ये २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया या संघासाठी खेळला होता. त्या सीजनमध्ये मायकल क्लार्कने एकूण ९४ चेंडू खेळले होते पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. क्लार्कने ऑस्ट्रेलियासाठी ३९४ सामने खेळले आहेत आणि १०२ षटकार ठोकले आहेत. पण आयपीएलमध्ये क्लार्क फ्लॉप ठरला.
२) कॅलम फर्ग्युसन
ऑस्ट्रेलियाचा कॅलम फर्ग्युसन आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला आहे. कॅलम फर्ग्युसन २०११ आणि २०१२ मध्ये आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. कॅलम फर्ग्युसनने आयपीएलममध्ये एकही षटकार ठोकला नाही. आयपीएलमध्ये षटकार न मारता सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा अनोखा विक्रमही फर्ग्युसनच्या नावावर आहे. फर्ग्युसनने ऑस्ट्रेलियासाठी एकूण ३४ सामने खेळले आहेत आणि तो ऑस्ट्रेलियासाठीही षटकार ठोकू शकला नाही. आयपीएलमध्ये फर्ग्युसनने फक्त ८३.७६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.
३) मायकल क्लिंगर
मायकल क्लिंगरही त्या खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्यांनी आयपीएलमध्ये एकही षटकार ठोकला नाही. या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आयपीएल २०११ मध्ये सहभाग घेतला होता. क्लिंगर कोच्ची टस्कर्स केरलाकडून तो खेळत होता. क्लिंगरने आयपीएलमध्ये ४ सामन्यात ७७ चेंडू खेळले होते. पण त्याने एकदाही षटकार ठोकला नाही. आयपीएलमध्ये क्लिंगरने फक्त ९४.८१ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. क्लिंगर ऑस्ट्रेलियासाठी फक्त ३ टी-२० सामने खेळला होता आणि या सामन्यात २ षटकार ठोकले होते.