क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर त्याने सातत्याने धावांचा पाऊस पाडत अनेक विविध विक्रम आपल्या नावावर केले. यासह ६६४ सामन्यांमध्ये सचिनने ३४, ३५७ धावा केल्या आहेत. यावर आता माजी ऑस्ट्रेलिया खेळाडूने सचिन तेंडुलकरशी आपली तुलना करत मोठं वक्तव्य केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरशी तुलना करत त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल धाडसी दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उशिरा पदार्पण केल्यामुळे तो सचिनपेक्षा कमी धावा करू शकला त्याचं म्हणणं आहे. हसीने म्हटलं की त्याने जर सचिनप्रमाणे लवकर पदार्पण केलं तर धावसंख्येत लक्षणीय वाढ झाली असती आणि तो रेकॉर्ड बुकमध्ये तेंडुलकरच्या पुढे जाऊ शकला असता.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने लहान वयात खेळायला सुरुवात केली असती तर त्याने सचिन तेंडुलकरपेक्षा ५००० धावा जास्त केल्या असत्या असे त्याचे मत आहे. हसीने वयाच्या २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि ३०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ४९ च्या सरासरीने १२३९८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने २२ शतकं झळकावली आहेत.
मायकेल हसीने द ग्रेड क्रिकेटर यूट्यूब चॅनलवर बोलताना विनोदाने स्वतःची तुलना सचिन तेंडुलकरशी केली आणि म्हटलं, “मला अनेकदा वाटायचं की जर मी आधी पदार्पण केलं असतं, तर मी सचिन तेंडुलकरपेक्षा ५ हजार धावा जास्त केल्या असत्या, सर्वाधिक शतकं, सर्वाधिक अॅशेस जिंकल्या असत्या, सर्वाधिक सामने जिंकले असते आणि अगदी विश्वचषकही जिंकला असता, पण हे सगळं स्वप्न आहे.”
मिस्टर क्रिकेट म्हणून ओळख असलेला माईक हसी म्हणाला, “मला लवकर संधी मिळाली असती तर आवडलंच असतं. पण माझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा माझी निवड झाली तेव्हा मला माझ्या खेळाची चांगली समज होती.”
सचिन तेंडुलकर किती वर्षांचा असताना त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं?
सचिन तेंडुलकरने वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर सचिनने मागे वळून पाहिलं नाही आणि शतकांचा सिलसिला सुरू केला. सचिनने १९८९ ते २०१३ पर्यंत भारतासाठी खेळलेल्या ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) एकूण ३४,३५७ धावा केल्या आहेत.
माईकल हसीने २८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००४ मध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासाठी ७९ कसोटी सामन्यांमध्ये ६,२३५ धावा केल्या. त्याच्या नावावर १८५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,४४२ धावा आणि ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७२१ धावा आहेत. हसीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला होता.
