हरारे :वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंच्या ‘प्रांतीय’ मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. आम्ही देशासाठी एकत्रित येऊन खेळणे आवश्यक आहे, असे मत वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डरने व्यक्त केले.
दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजवर प्रथमच एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकण्याची नामुष्की ओढवली आहे. पात्रता स्पर्धेतील ‘सुपर सिक्स’ फेरीत शनिवारी स्काटॅलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने विंडीजचा संघ यंदा भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विंडीज क्रिकेटबाबत आजी-माजी खेळाडूंकडून परखड मत व्यक्त केले जात आहे.
‘‘क्रिकेटमध्ये वैयक्तिक यश किंवा आपल्या प्रांताचा विचार करून खेळणे योग्य नाही. आम्ही देश म्हणून एकत्रित येणे आणि भविष्याचा विचार करून योग्य दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे,’’ असे होल्डर म्हणाला.
बार्बाडोस, गयाना, जमैका, लीवर्ड आयलँड्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो व विन्डवर्ड आयलँड्स या विविध सहा बेटांवरील खेळाडू एकत्रित येऊन वेस्ट इंडिजसाठी खेळतात.
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव १८१ धावांतच संपुष्टात आला. मग स्कॉटलंडने विजयी लक्ष्य सात गडी आणि ३९ चेंडू राखून गाठले. ‘‘आम्हाला स्कॉटलंडला नमवून विश्वचषक पात्रतेच्या आशा कायम राखण्याची नक्कीच संधी होती. मात्र, आम्ही अपयशी ठरलो. माझ्या कारकीर्दीतील हा बहुधा सर्वात वाईट क्षण आहे. परंतु आमच्यासाठी काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. निकोलस पूरनने चांगली कामगिरी केली. तसेच काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आणि त्यांनी विश्वास सार्थ ठरवला,’’ असे होल्डरने सांगितले.
यश मिळवण्यासाठी पळवाट नाही!
वेस्ट इंडिज क्रिकेटला पुन्हा वर आणायचे असल्यास आम्हाला खेळाडू घडवावे लागतील, असे होल्डर म्हणाला. ‘‘यश मिळवण्यासाठी पळवाट नाही. गेल्या काही वर्षांत आम्हाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही, हे सत्य आहे. आता आम्हाला वेळ द्यावा लागेल. तळागाळात विकास महत्त्वाचा आहे. प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांना घडवणे गरजेचे आहे. विविध वयोगटांतील स्पर्धा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुधारणा गरजेची आहे. तसे झाल्यास युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आल्यानंतर तेथे स्थिरावण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी वेळ लागणार नाही,’’ असे होल्डरने नमूद केले.
