फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोलांच्या विश्वविक्रमाला गवसणी घालणारा जर्मनीचा अव्वल फुटबॉलपटू मिरोस्लाव्ह क्लोसने सोमवारी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. जर्मन फुटबॉलमधील एका सुरेख पर्वाची सोमवारी सांगता झाली. जर्मनीला ऐतिहासिक विश्वचषक जिंकून दिल्यानंतर महिनाभराच्या आत ३६ वर्षीय क्लोसने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
ब्राझीलमध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या सोहळ्यात जर्मनीने अर्जेटिनाला १-० असे हरवून १९९० नंतर प्रथमच विश्वचषकावर मोहोर उमटवली. या विश्वचषकात क्लोसने दोन गोल करून ब्राझीलच्या रोनाल्डोचा सर्वाधिक गोलांचा विश्वविक्रम मोडीत काढून नवा अध्याय रचला. जर्मनीतर्फे सर्वाधिक ७१ गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. ‘‘ब्राझीलमधील विजयानंतर माझे लहानपणापासूनचे स्वप्न सत्यात उतरले. जर्मनीच्या यशात योगदान देऊ शकलो, याचा मला अभिमान वाटतो. राष्ट्रीय संघातून खेळताना अनेक अविस्मरणीय क्षणांचा मी वाटेकरी बनलो,’’ असे क्लोसने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सांगितले.
पोलंडमध्ये जन्मलेल्या क्लोसने २००१मध्ये जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. सलग चार विश्वचषकांत गोल करणारा तो पेले, उवे सीलेर यांच्यानंतरचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीत ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात ७-१ असा विजय मिळवून संघाच्या विजयात योगदान देणाऱ्या क्लोसने रोनाल्डोचा १५ गोलांचा विश्वविक्रम मागे टाकला. २००२च्या विश्वचषकात पाच गोल, मायदेशातील २००६च्या विश्वचषकात पाच गोल, २०१०च्या विश्वचषकात चार गोल आणि २०१४च्या विश्वचषकात दोन गोल करून त्याने १६ गोलांसह विश्वविक्रमाला गवसणी घातली. जर्मनीतर्फे सर्वाधिक १३७ सामने खेळणारा तो लोथार मॅथ्यूज यांच्यानंतरचा दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे.
क्लोसच्या निवृत्तीविषयी जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लो म्हणाले, ‘‘क्लोस हा आंतरराष्ट्रीय स्टार आणि महान आघाडीवीरांपैकी एक आहे. त्याचे फुटबॉलमधील कौशल्य, मेहनत घेण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे.’’ विश्वचषक विजेतेपदानंतर लगेचच निवृत्ती पत्करणारा जर्मनीचा कर्णधार फिलिप लॅम आणि क्लोस यांना लवकरच जर्मन फुटबॉल असोसिएशनकडून निरोप दिला जाणार आहे.

गोल करणे ही आघाडीवीराची जबाबदारी असते. विक्रमांचा मी कधीही विचार केला नाही. आघाडीवीर हा सहकाऱ्यांवर अवलंबून असतो, त्यामुळे माझ्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाला यशोशिखरावर नेण्यासाठीच मी प्रथम प्राधान्य दिले.
– मिरोस्लाव्ह क्लोस