बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरुदरम्यान झालेल्या अटीतटीच्या सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यासंदर्भात बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने सामन्यानंतर मत व्यक्त करताना सामन्यातील पंचांना चांगलेच खडेबोल सुनावले.
सामना संपल्यानंतर लसिथ मलिंगाने टाकलेला शेवटचा चेंडू नो- बॉल असल्याचे स्पष्ट झाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पंचांचा निर्णय अंतिम असल्याने मुंबई इंडियन्सला विजयी घोषित करण्यात आले. मात्र हा चेंडू नो असल्याचा निर्णय पंचांनी वेळीच दिला असता तर कदाचित सामन्याचा निकाल बंगळुरूच्या बाजूने लागला असता. म्हणूनच सामना संपल्यानंतर विराटने याप्रकरणात आपला राग व्यक्त केला. ‘आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. हा आयपीएलचा सामना होता एखाद्या क्लब क्रिकेटचा नाही. पंचांनी मैदानात डोळे उघडे ठेवून उभं राहणे अपेक्षित आहे. शेवटच्या चेंडूवर पंचाचा निर्णय मूर्खपणाचा होता. इथे थोड्याश्या फरकाने समान्याच्या निकालावर फरक पडतो. इथे काय सुरु आहे मला अंदाजच येत नाहीय. पण पंचांनी मैदानावर जास्त सजग राहिले पाहिजे. अशा अटीतटींच्या समान्यांमध्ये पंचांनी जास्त काळजी घ्यायला हवी.’
नक्की काय झाले शेवटच्या षटकामध्ये
शेवटच्या षटकात बंगळुरूला सहा चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाच्या या षटकामध्ये पहिल्या पाच चेंडूत बंगळुरुला १० धावा काढण्यात यश मिळाले. त्यामुळे विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज होती मात्र षटकार मारला तरी सामना अर्णिर्नित राहून त्याचा निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून लागला असता. अखेरच्या चेंडूवर बंगळूरच्या फलंदाजांना एकच धाव घेता आली आणि मुंबईच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. मात्र या गोंधळामध्ये मलिंगाने टाकलेले शेवटचा चेंडू नो बॉल होता याकडे पंचांचे लक्ष गेले नाही. ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर पंचाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत मुंबईनेच सामना जिंकल्याचे जाहिर करण्यात आले.
