IND vs AUS 4th Test Match Updates:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू झाला आहे. आज पहिल्या दिवसाचा खेळ खेळला गेला. पण भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर आपल्या संघाच्या कामगिरीवर खूश नाहीत. मोहम्मद शमीने नव्या चेंडूवर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरूनही ते खूपच नाराज आहेत.
दोन्ही संघांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्यांनी पहिल्या दिवशी चांगली फलंदाजी करत भारतावर दडपण आणले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ मध्ये भारत २-१ ने आघाडीवर आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या मोहम्मद शमीने या सामन्यात पुनरागमन केले. या सामन्यात त्याला नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करता आली नसली, तरी सुनील गावस्कर यांना याचे फार वाईट वाटले. वेगवान गोलंदाजाने फिटनेस मेंटेन केला पाहिजे, असेही माजी फलंदाजाचे मत आहे.
मोहम्मद शमीला विश्रांती द्यायला नको होती –
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, “मोहम्मद शमीला विश्रांती देणे योग्य नव्हते. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीमध्ये ८8 दिवसांचा ब्रेक होता. त्याने पहिले दोन चेंडू नीट टाकले नाहीत. असेच घडते, फलंदाज सुरुवातीला थोडे घाबरलेले असतात. कारण त्यांनी त्यांचे खाते उघडलेले नसत. जर तुम्ही त्यांच्यासाठी सामान्य गोलंदाजी केली तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.”
गावसकर पुढे म्हणाले, “चांगला गोलंदाज पहिल्या चेंडूपासूनच फलंदाजावर आक्रमण करुन दबाव निर्माण करायचा प्रयत्न करतो. तो (शमी) त्याच्या लाइन-लेंथ पासून भरकटला होता. त्याने खूप वाईड बॉल टाकले. मोहम्मद शमी हा लयीत गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. म्हणूनच तुम्ही त्याला विश्रांती द्यायला नको होती. विश्रांतीमुळे त्याची लय पूर्णपणे बिघडली.”
सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ९० षटकांत ४ बाद २५५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक धावा केल्या. तो १०४ धावांवर नाबाद आहे. त्याचबरोर कॅमरुन ग्रीन देखील ४९ धावांवर नाबाद आहे. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जडेजा आणि आश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.