Mohammed Siraj Ollie Pope: ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. याआधी या मैदानावर इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला जर हा सामना जिंकायचा असेल तर इतिहास बदलावा लागणार आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्या दिवसाच्या शेवटी मोठा धक्का बसला. जॅक क्रॉउले लवकर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने इंग्लंडला लागोपाठ २ मोठे धक्के दिले.
या मालिकेत इंग्लंडचा संघ २- १ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला, तरीदेखील इंग्लंडचा संघ ही मालिका जिंकणार आहे. पण इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जॅक क्रॉउले आणि बेन डकेट यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजने भन्नाट यॉर्कर चेंडू टाकून जॅक क्रॉउलेला त्रिफळाचित करून माघारी धाडलं.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ओली पोप आणि बेन डकेट यांची जोडी मैदानावर आली. या जोडीनेही ५० धावा जोडल्या. पण प्रसिध कृष्णाने बेन डकेटला झेलबाद करत माघारी धाडलं. तो ८३ चेंडूत ५४ धावा करत माघारी परतला. बेन डकेट बाद झाल्यानंतर कर्णधार ओली पोप फार वेळ मैदानावर टिकू शकला नाही.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून २८ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. या षटकातील सुरुवातीचे २ चेंडू त्याने अचूक लाइन लेंथवर टाकले. पण तिसरा चेंडू टप्पा पडताच वेगाने आत आला पोपच्या पॅडला जाऊन लागला. हा चेंडू इतका वेगाने आत आला की, पोपला बॅट समोर आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. चेंडू पॅडला लागल्यानंतर मोहम्मद सिराजने जोरदार अपील केली आणि पंचांनी लगेच बोट वर करून त्याला बाद घोषित केलं. पोपने डीआरएसची मागणी केली. पण डीआरएसमध्ये तो बाद असल्याचं दिसून आलं.