Mohammed Siraj Stunning Catch Video Viral: भारतीय संघाने बर्मिंगहमचं चक्रव्यूह भेदत इंग्लंड संघाच्या नाकावर टिचून ऐतिहासिक विजय नोंदवला. भारताने इंग्लंडला ३३६ धावांच्या मोठ्या धावसंख्येने पराभूत केलं. यासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि शुबमन गिल यांनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. दरम्यान या सामन्यात वेगवान गोलंदाज असूनही सिराजने कमालीचा झेल टिपला आहे. ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ६ विकेट्स घेत इंग्लंडला ऑल आऊट करण्यात मोठी भूमिका बजावली होती. सिराजने ६ विकेट्स घेतले होते आणि त्यापैकी ४ जणांना त्याने खातंही उघडू दिलं नव्हतं. तर दुसऱ्या डावात सिराजने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला त्यानंतर त्याला विकेट घेता आली नाही. पण त्याने एक कमालीचा झेल मात्र टिपला.
रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या डावातील ६४वे षटक टाकण्यासाठी आला होता. षटकातील पाचव्या चेंडूसाठी जोश टंगकडे स्ट्राईक होती. टंगला हा चेंडू फ्लिक करायचा होता. पण चेंडू समोरच्या दिशेने गेला, जिथे मोहम्मद सिराज फिल्डिंगसाठी तैनात होता. मोहम्मद सिराजच्या बाजूने चेंडू जाणार हे त्याला कळताच त्याने उजव्या बाजूला हवेत झेपावत दोन्ही हात पुढे केले आणि अखेरीस उजव्या हाताने तो चेंडू त्याने टिपला आणि सिराज मैदानावर पडला. पण चेंडू मात्र त्याच्या हातातून सुटला नाही आणि त्याने यशस्वीपणे झेल टिपला.
सिराजने कमालीचा झेल टिपलेला पाहताच सर्व खेळाडू त्याच्या दिशेने विकेटचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचले. सर्वात आधी करूण नायर धावत गेला आणि अलगद त्याच्या पाठीवर जाऊन बसला आणि त्याला शाबासकी दिली. तर इतर सर्वांनी वाकून त्याला कमालीच्या झेलसाठी त्याची पाठ थोपटली. भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओही व्हायरल होत आहे. तर सिराजने टिपलेल्या या झेलला सचिन तेंडुलकरने त्याच्या पोस्टमध्ये मोहम्मद ‘जॉन्टी’ सिराज असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. जॉन्टी रोड्स हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू असून तो क्रिकेट इतिहासातील एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे.
सिराजच्या कमाल झेलसह जडेजालाही सामन्यातील पहिली विकेट मिळाली. जडेजाने या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये बॅटने चांगली कामगिरी केली होती. त्याने दोन्ही डावात अर्धशतक केली, पण त्याला विकेट मिळाली नव्हती. अखेरीस त्याने विकेटही आपल्या नावे केली.
भारतीय संघाने इंग्लंड संघाला विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड संघ २७१ धावांवर सर्वबाद झाला. यासह, भारताने बर्मिंगहमच्या मैदानावर पहिला कसोटी विजय नोंदवला. याशिवाय, भारतीय क्रिकेट संघ बर्मिंगहममध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली असा चमत्कार घडला आहे.