Mohammed Siraj 2 Ball 2 Wickets Video: भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दबदबा आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ५८७ धावांचा मोठा डोंगर उभारला आहे. तर प्रत्युत्तरात इंग्लंडचे फलंदाज भारताच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. इंग्लंडने दुसऱ्याच दिवशी डावाच्या सुरूवातीला ३ विकेट्स गमावले आणि ७७ धावा केल्या. तर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच सिराजने इंग्लिश संघाला लागोपाठ २ धक्के दिले आहेत.
मोहम्मद सिराजला गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीमुळे ट्रोल केलं जात आहे. त्याला फार विकेटही मिळत नव्हत्या. पण तिसऱ्या दिवशी त्याने संघाला दणक्यात सुरूवात करून दिली आहे. पहिल्या अर्ध्या तासात भारताने २ चेंडूत २ विकेट गमावले आहेत. ज्यामध्ये जो रूट आणि बेन स्टोक्स या मोठ्या फलंदाजांच्या विकेट होत्या.
लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात खराब गोलंदाजीमुळे टीकेचा सामना करावा लागलेल्या सिराजने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केलं. सिराजने एजबॅस्टनमध्ये इंग्लिश संघाला चांगलाच दणका दिला. सिराजने तिसऱ्या दिवशी २ मोठे विकेट घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दिवसाच्या दुसऱ्या षटकात सिराजने सलग २ चेंडूंवर रूट आणि स्टोक्सचे बळी घेतले.
सिराजचा पहिला बळी इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट होता. जो इंग्लंडच्या फलंदाजीचा सर्वात मोठा आधार आहे. रूट सिराजच्या चेंडूवर बॅकसाईडला फ्लिक करायला गेला आणि टायमिंग चुकल्याने चेंडू बॅटची कड घेत थेट पंतच्या हातात पोहोचला आणि पंचांनी त्याला बाद घोषित केलं. रूट बाद झाल्याचं पाहून स्वत:ही चकित झाला. कारण त्याने अनेकदा फ्लिक करत चौकारासाठी चेंडू पाठवला आहे. रूट मैदानाबाहेर जाताना सातत्याने मागे पाहत होता, की नेमकं काय झालं.
रूटनंतर आलेला बेन स्टोक्स पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. सिराजने पहिलाच चेंडू बाऊन्सर टाकला आणि स्टोक्स अखेरच्या क्षणी चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बॅटला लागून तो पंतच्या ग्लोव्हजमध्ये पोहोचला. पंतने विकेटच्या मागे कोणतीही चूक न करता दोन्ही झेल टिपले. ज्यामुळे भारताला दोन मोठे विकेट मिळाले.
इंग्लंडचा निम्मा संघ तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच तंबूत परतला आहे. सध्या मैदानावर हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथची जोडी मैदानात आहे. जे इंग्लंडसाठी खोऱ्याने धावा करण्याचा प्रयत्न करत आहेत.